Sangli ZP Pudhari
सांगली

Sangli ZP: लोक म्हणतात...'साहेब सापडतच नाहीत!'

सोमवार, गुरुवारी उपस्थिती बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी कार्यालयात सहज उपलब्ध होत नसल्याने लोकप्रतिनिधी व नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा मुद्दा सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला.

सदस्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी सर्व विभागप्रमुखांनी जिल्हा परिषद मुख्यालयात दिवसभर उपस्थित राहून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

सभेत अनेक अधिकारी

बैठका, दौरे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्याने विकासकामे, मंजुरी आणि दैनंदिन कामांवर परिणाम होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. 'प्रत्येक वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच सुरू असते का?' असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला.

सीईओंच्या नव्या निर्देशांमुळे प्रशासनात शिस्त येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी यापूर्वीच्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने यावेळीही आदेश कागदावरच राहणार की प्रत्यक्षात अधिकारी नियमित उपस्थित राहणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

'नव्याचे नऊ दिवस' ठरणार?

सीईओ विशाल नरवाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वेळेत उपस्थितीबाबत कठोर भूमिका घेत सकाळी ठराविक वेळेनंतर प्रवेशद्वार बंद करणे आणि उशिरा येणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र ही मोहीम पुढे थंडावली. त्यामुळे सोमवार-गुरुवार उपस्थितीचा नवा आदेशही 'नव्याचे नऊ दिवस' ठरणार की त्याची काटेकोर अंमलबजावणी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT