Sangli ZP Elections Pudhari
सांगली

Sangli ZP Election : दुरंगी, तिरंगी लढतीने चुरस

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार ः छुप्या प्रचाराचा जोर वाढणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : थंडी हळूहळू कमी होऊन किमान तापमान वाढत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय हवा मात्र गरमागरम झाली आहे. या स्थानिक संस्थांसाठी शनिवार, दि. 7 रोजी मतदान होत आहे. जाहीर प्रचाराची मुदत दि. 5 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. त्यामुळे गेले काही दिवस धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज गुरुवारी थंडावणार आहेत.

दुरंगी-तिरंगी लढतीने अनेक गट-गणांमध्ये चुरस वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाने सर्व गट आणि गणांत उमेदवार दिलेले नाहीत.या निवडणुकीत महायुती अथवा महाविकास आघाडी झाली नाही. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने मात्र अनेक गट-गणांत समझोता करून उमेदवार उभे केले आहेत. बहुसंख्य ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. काही ठिकाणी ‌‘वजनदार‌’ अपक्षांमुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रचारात राज्य पातळीवरील नेत्यांच्या फ ारशा सभा झाल्या नाही. मात्र, आपआपल्या भागात आपले वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच पक्षांचे आजी-माजी आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रचार यंत्रणा राबविली. एकमेकांवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते.

शनिवार, दि. 7 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यामुळे गुरुवार, दि. 5 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. असे असले तरी मात्र मतदान संपेपर्यंत छुपा प्रचार सुरूच राहतो. त्यामुळे निवडणुकीची चुरस मतदान संपेपर्यत राहणार, हे स्पष्ट आहे. प्रचाराला सुरुवातीला सात दिवसांचा अवधी मिळाला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे मतदानाची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्यात आली होती. प्रचाराचा आता शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे ‌‘शेवटचा दिवस, शेवटचा जोर‌’ या भूमिकेतून उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी सभा, पदयात्रा, कोपरा बैठका, घरभेटी आणि दुचाकी रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी प्रचाराची सांगता होताच सायंकाळनंतर कोणत्याही प्रकारचा जाहीर प्रचार करता येणार नसल्याने उमेदवारांनी ‌‘नियोजनबद्ध‌’ रणनीती आखली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी बूथ मॅनेजमेंटवर सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची नियुक्ती, मतदारांची यादी तपासणी आणि संपर्क यावर भर दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT