सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या 68 असलेली गटांची संख्या आता 61 झाली आहे. खानापूर मतदारसंघात एक गट आणि दोन गणांची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. दि. 14 जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द होणार आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयावर वर्चस्वासाठी राजकीय वातावरण आता तापणार आहे.
मंगळवार, दि. 10 जूनरोजी महापालिका आणि नगरपंचायत, नगरपरिषदांच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्यांचे डोळे जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेकडे लागले होते. गुरुवारी रात्री ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रभाग रचनेचे आदेश दिले. त्यामुळे दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
2017 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक झाली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेचे 60 गट आणि दहा पंचायत समित्यांचे 120 गण होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मुदत 20 मार्च 2022 रोजी संपली. महाविकास आघाडीच्या काळात नव्याने प्रभाग रचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे 68 आणि पंचायत समित्यांच्या 136 गणांची रचना करण्यात आली. त्यानुसार आरक्षणाची सोडतही काढण्यात आली. मात्र ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्याने आरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली होती. परिणामी तीन वर्षे निवडणूक झाली नाही. आता नव्या आदेशानुसार 68 गटांची संख्या 61 करण्यात आली आहे. खानापूर मतदारसंघात यापूर्वी नागेवाडी, लेंगरे आणि भाळवणी असे तीन गट होते. आता नव्याने या मतदारसंघात खानापूर गट आणि दोन गणांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या रचनेनुसार 61 गट आणि 122 गणांत निवडणूक होणार आहे.
प्रभाग रचना करताना 2017 मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रचना करताना शक्यतो ग्रामपंचायतीचे विभाजन होणार नाही, याचीही दक्षता घेण्यास सांगितले आहे.गटांची आणि गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यास दि. 14 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध केलेल्या रचनेवर हरकती आणि सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहेत त्यासाठी दि. 21 जुलैपर्यंत मुदत आहे. प्राप्त हरकतींच्या आधारे जिल्हाधिकारी आपला अभिप्रायासह प्रस्ताव दि. 28 पर्यंत विभागीय आयुक्त यांच्याकडे सुपूर्त करतील. दि. 11 ऑगस्टपर्यंत आलेल्या सूचनांवर व हरकतींवर विभागीय आयुक्त सुनावणी घेऊन निर्णय घेतील. दि. 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यास मुदत देण्यात आली आहे. गट आणि गणांच्या प्रभाग रचनेच्या आदेशांमुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
महापालिकेच्या प्रभाग रचनेस अंतिम प्रसिद्धी देण्यासाठी दि. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचनेस दि. 18 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेच्या अगोदर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.