सांगली : भविष्य निर्वाह निधीतील मंजूर रकमेच्या प्रस्तावासाठी दोन हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या दोघा कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील भविष्य निर्वाह निधीचा वरिष्ठ सहायक (लेखा) पूजन विलास भंडारे (वय 31, भोई गल्ली, कासेगाव, ता. वाळवा) व त्याच विभागातील कनिष्ठ सहायक निखिल राजीव कांबळे (वय 35, रा. माता सावित्रीबाई फुले सोसायटी, नांदणी रोड, मौजे संभाजीपूर, जयसिंगपूर, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी या दोघांना अटक करून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘लाचलुचपत प्रतिबंधक’ने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे स्वतः लोकसेवक आहेत. त्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मधील पाच लाख रुपये मंजूर रक्कम काढण्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी भंडारे याने पैशाची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय सहकार्य होत नाही, असे सांगत अडीच हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार दिली.
त्यानुसार गुरुवारी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत भंडारे याने अडीच हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच निखिल कांबळे याने चर्चेत सहभाग घेऊन तक्रारदार यांना प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. भंडारे याला दोन हजारांची लाच घेताना कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले. प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कांबळे यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांविरोधात भ्रष्टाचार अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, ऋषिकेश बडणीकर, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, अतुल मोरे, सीमा माने यांचा कारवाईत सहभाग होता.
जिल्हा परिषदेतील कारभार चव्हाट्यावर
तक्रारदाराचे हे पीएफचे पैसे होते. कष्टाचे पैसे मिळण्यासाठी दोन हजार रुपये घेताना दोघे सापडल्याने जिल्हा परिषदेतील कारभार चव्हाट्यावर आला आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराची काही प्रकरणे उघड झाली आहेत.