Sangli Jilha Parishad Pudhari File Photo
सांगली

Sangli News : सहा तासात ४०० फायली निकालात

अध्यक्षांच्या निर्देशानंतर प्रशासनाची धावपळ

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये सुमारे १५०० हून अधिक फायली प्रलंबित असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता पाटील यांनी याची गंभीर दखल घेतली. फायलींचा निपटारा तातडीने करून प्रलंबित राहिल्याबाबत वस्तुनिष्ठ खुलासा करण्याचे आदेश सीईओंना दिले होते. त्यानंतर सहा तासात सुमारे चारशे फायली निकालात निघाल्या. एका दिवसात इतक्या फायलींचा निपटारा झाला, मग इतके दिवस का थांबल्या होत्या?, याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

विविध विभागात अनेक फायली दोन महिन्यांहून अधिक काळ रखडून राहिल्याने प्रशासकीय निर्णय आणि लोकप्रतिनिधींमार्फत पाठपुरावा करण्यात आलेल्या प्रस्तावांचा खोळंबा होत होता. त्यामुळे पदाधिकारी व सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. अध्यक्ष पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत अध्यक्ष पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रलंबित फायलींबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश गुरुवारी दिले. कोणत्या विभागात किती फायली प्रलंबित आहेत, त्या किती दिवसांपासून रखडल्या आहेत, तसेच विलंबाला जबाबदार कारणे कोणती याचा खुलासा करण्यास सांगितले. तसेच फायली विनाकारण प्रलंबित ठेवण्याच्या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अध्यक्षांच्या निर्देशानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी गुरुवारी तातडीने सकाळी ११ वाजता खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत प्रत्येक विभागातील प्रलंबित फायलींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित फायली तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीनंतर जिल्हा परिषद मुख्यालयासह विविध विभागांमध्ये दिवसभर फाईल निपटाऱ्याची प्रक्रिया सुरू होती. अधिकाऱ्यांनी प्रलंबित फायलींची तपासणी करून आवश्यक शेरा व निर्णय प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला.

सकाळी १२ वाजता विविध विभागात १ हजार ६३५ फायली प्रलंबित होत्या. दुपारी ही संख्या १ हजार ३६८ झाली. सायंकाळी १ हजार २३४ फायली प्रलंबित दिसत होत्या. सुमारे सहा तासात ४०१ फायलींचा निपटारा झाला. त्यामुळे दीड-दोन महिन्यांपासून कोणत्या कारणासाठी फायली खोळंबल्या होत्या, प्रलंबित असलेल्या फायली काही तासात कशा काय निकालात निघाल्या, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT