सांगली : जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणात थेट भाजपविरोधी भूमिका घेण्यापेक्षा मतदानावेळी तटस्थ अथवा अनुपस्थित राहण्याचा पर्याय अधिक व्यवहार्य ठरू शकतो, अशी चर्चा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या काही नेत्यांमध्ये सुरू आहे.
उघडपणे कोणाच्याच बाजूने उभे न राहता, जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या भाजपविरोधात लढलो, त्यांना सत्तेपासून दूर ठेवता येते आणि ज्यांच्याशी समझोत्याने निवडणूक लढवली, त्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा बहुमताचा मार्ग अप्रत्यपक्षपणे मोकळा होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी नेमका कोणता पर्याय राष्ट्रवादी अवलंबणार, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी 61 पैकी 31 जागांची जादुई संख्या आवश्यक आहे. एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 18, काँग्रेस 11 आणि शिवसेना (उबाठा) 1 असे मिळून 30 सदस्यांची आघाडी उभी आहे. त्यांचे बहुमत केवळ एका जागेने हुकले आहे. दुसरीकडे भाजपचे संख्याबळ 16 आहे. जनसुराज्यचा 1 व रयत क्रांतीचा 1 सदस्य भाजपसोबत आहे. शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांनी ही निवडणूक प्रामुख्याने भाजपविरोधात लढवली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याबाबत त्यांच्यात स्पष्ट अनिच्छा दिसते.
व्हीपची आठवण; भाजपचे दबावतंत्र
केंद्र व राज्यस्तरावर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी महायुती असल्याने आता स्थानिक स्तरावर सत्तास्थापनेतही महायुती व्हावी, यासाठी भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढत आहे. त्यातून पक्षांतरविरोधी कायद्याची आठवण भाजपकडून सातत्याने करून दिली जात आहे. प्रदेश राष्ट्रवादीकडून व्हीप आल्यास तो सदस्यांना पाळावा लागेल अन्यथा घरी बसावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशारा भाजपकडून दिला जात आहे. हा राष्ट्रवादीबरोबरच इथल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांवर, नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
शिवसेनाही भाजपविरोधी पवित्र्यात
मात्र सांगलीतील राजकारणात स्थानिक समीकरणेही अधिक प्रभावी ठरताना दिसत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील काही नेत्यांची भूमिका पाहता, ते थेट भाजपसोबत जाण्यापेक्षा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे झुकतील, अशी चर्चा आहे. सत्तास्थापनेच्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सहा सदस्य अनुपस्थित राहण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे. हा तटस्थतेचा डाव निर्णायक ठरू शकतो.
शिवसेनेचे स्थानिक नेतेही भाजपविरोधात भूमिका घेण्याच्या पवित्र्यात दिसत आहेत. राष्ट्रवादी अथवा शिवसेनेने तटस्थता अथवा अनुपस्थिती हा पर्याय निवडल्यास भाजप बहुमतापासून दूर जातो, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उबाठा यांचा सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो.