सांगली : जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत बुधवारी सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष विषय समितीच्या सभापती निवडीकडे लागले आहे. सत्तास्थापनेत यश मिळवलेल्या आघाडीसाठी आता अंतर्गत समन्वय राखत सभापती निवडीत एकी टिकवणे हे मोठे आव्हान आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत आघाडीने एकजूट दाखवत बाजी मारली. मात्र, पुढील टप्प्यात सभापती पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत चुरस दिसत आहे. सभापतीपद मिळवण्यासाठी इच्छुक सदस्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांची नाराजी दूर ठेवत संतुलन साधण्यासाठी नेत्यांची कसरत सुरू होणार आहे.
सभापतीपदाच्या निवडीला जिल्हा परिषदेच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. शिक्षण, आरोग्य, बांधकाम, अर्थ, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, अशा एकूण चार समित्यांचे चार सभापती असतात. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षच स्थायी आणि जलव्यवस्थान समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्षांकडे दोन समित्यांचा कारभार असतो. मात्र शिक्षण, आरोग्य, बांधकाम, महिला व बालकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर सभापतींचा प्रभाव असतो. त्यामुळे या पदांसाठी इच्छुकांची स्पर्धा स्वाभाविक आहे. अनेक सदस्यांनी आपापल्या नेत्यांकडे ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत ज्या पद्धतीने समन्वय साधला गेला, तोच फॉर्म्युला सभापती निवडीतही वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेत असल्याने तडजोडी अपरिहार्य ठरणार आहेत. दरम्यान, सत्तास्थापनेत यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी पदवाटपाच्या टप्प्यावर नाराजी उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी ‘आमचाही हक्क’ अशी भूमिका घेत इच्छुकांनी दबाव तंत्र सुरू केले आहे. त्यामुळे आघाडीतील वरिष्ठ नेत्यांना समन्वय साधण्यासाठी बैठकांची मालिकाच घ्यावी लागणार असल्याचे दिसत आहे.
भाजप आणि महायुतीसाठी हा धक्का मानला जात आहे, मात्र सभापती निवडीत तरी आघाडीमध्ये मतभेद निर्माण होतील का?, याकडे त्यांचेही लक्ष लागले आहे. विरोधकांकडून आघाडीतील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडीने अधिक सावध भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेत स्थिर कारभारासाठी एकजूट आवश्यक असल्याचे जाणून नेतेमंडळी संयमाने पावले टाकत आहेत. पुढील आठवड्यात सभापती निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मात्र त्या आधीच सर्व गटांमध्ये तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडीने अंतर्गत मतभेद दूर ठेवत एकी कायम ठेवली, तर जिल्हा परिषदेत त्यांची सत्ता अधिक मजबूत होणार आहे. मात्र, नाराजीचा उद्रेक झाल्यास सत्तेतील समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.