सांगली : जिल्हा परिषदेचे 61 गट व दहा पंचायत समित्यांच्या 122 गणांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार, दि. 16 पासून सुरू होत आहे. इच्छुक उमेदवारांना दि. 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तालुका पातळीवर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जिल्हाधिकारी शुक्रवारी जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. गट व गणांची रचना, आरक्षण निश्चिती आणि मतदार याद्यांचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. आता प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.
शुक्रवारपासून सकाळी 11 ते 3 या वेळेत ज्या-त्या तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, नामनिर्देशन शुल्क आणि शपथपत्रांसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दि. 21 जानेवारीरोजी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर दि. 22 रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल. दि. 27 जानेवारीरोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्याचदिवशी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, चिन्हांचे वाटपही याच दिवशी केले जाणार आहे. त्यानंतर खऱ्याअर्थाने प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे. सध्या अनेक इच्छुकांनी नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. उमेदवारी निश्चितीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
ग्रामीण भागातील विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत असले तरी, अनेक गटांमध्ये थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. जिल्ह्यात आचारसंहिता लागू आहे. जिल्हाधिकारी याबाबत शुक्रवारी सविस्तर अधिसूचना जाहीर करणार आहेत. त्यानंतर निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील सर्व टप्पे राबवले जाणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे आगामी काळात ग्रामीण भागातील राजकारण तापणार, हे मात्र निश्चित आहे.