2,100 अर्जांची विक्री; केवळ 26 दाखल  
सांगली

Sangli News : 2,100 अर्जांची विक्री; केवळ 26 दाखल

अर्ज भरण्यास दोन दिवसाची राहिली मुदत ः तरीही अल्प प्रतिसाद ः आज, उद्या होणार गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत 2 हजार 157 अर्जांची विक्री झाली आहे. मात्र आतापर्यंत झेडपीसाठी 19 आणि पंचायत समितीसाठी 7 असे एकूण केवळ 26 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यास सोमवारी अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवार, दि. 21 पर्यंत मुदत असल्याने दोन दिवस इच्छुकांची गर्दी होण्याचा अंदाज आहे.

झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या तीन दिवसात आतापर्यंत तब्बल 2 हजार 157 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत अद्याप अपेक्षित गती दिसून आलेली नाही. सोमवारी जिल्हा परिषदेसाठी 19, तर पंचायत समितीसाठी अल्प म्हणजे केवळ 7 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने मंगळवार आणि बुधवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तालुका पातळीवरील तहसील कार्यालये आणि निवडणूक विभागाच्या कार्यालयात अर्ज घेण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची ये-जा सुरू होती. सोमवारी 1 हजार 138 अर्जांची विक्री झाली. सध्या अनेक इच्छुकांनी अर्ज खरेदी करून ठेवले असले, तरी अंतिम निर्णयासाठी पक्ष पातळीवरील चर्चा, युती, जागावाटप तसेच अंतर्गत राजकारणामुळे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संथ असल्याचे चित्र आहे. मात्र मुदत संपण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील, असा अंदाज यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात या निवडणुकीला ‌‘मिनी विधानसभेची‌’ उपमा दिली जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी राजकीय समीकरणे ठरवणाऱ्या मानल्या जातात. त्यामुळेच प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. गावोगावी बैठका, गाठीभेटी, मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, समर्थकांची मोट बांधणे यावर भर दिला जात आहे.

विशेष म्हणजे, महापालिका आणि नगरपरिषदांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे पडसाद या ग्रामीण निवडणुकीवरही उमटताना दिसत आहेत. काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी, इच्छुकांची संख्या वाढल्याने बंडखोरीची शक्यता, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची भाषा पुढे येत आहे. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन यंत्रणेकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. एकूणच, अर्ज विक्रीचा आकडा वाढत असताना प्रत्यक्ष दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या पुढील दोन दिवसांत लक्षणीयरीत्या वाढणार आहे. त्यातूनच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील खरी लढत, राजकीय चित्र आणि ग्रामीण भागातील बदलते समीकरण स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT