महायुतीचे सूर बेसूर ः स्वबळावर जोर  
सांगली

Sangli Politics : महायुतीचे सूर बेसूर ः स्वबळावर जोर

कुठे पिढीजात वैर, तर कुठे अंतर्गत धूसफू स येतेय आड ः एकीचा दोर धरून ठेवणे नेत्यांसाठी कसोटी

पुढारी वृत्तसेवा

संजय खंबाळे

सांगली ः महायुतीच्या घटकपक्षांची बोलणी झाली, बैठक झाली, चहापाण्याच्या फेऱ्याही रविवारी पार पडल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झेडपी आणि पंचायत समित्यांची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केले. मात्र नाव एक आणि दिशा दाखवणारे अनेक, अशी अवस्था झाली आहे. कोण कोणाचा सख्खा नाही, असा सूर गावोगावी ऐकायला येत आहे. स्वतःच्या ताकदीवर मैदानात उतरण्याची भाषा सुरू आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, तासगाव तालुक्यात तर नेत्यांमध्ये युतीबाबत बेसूर असल्याचे चित्र आहे. या तालुक्यात स्वबळाचा नारा जोर धरू लागला आहे. त्यामुळे महायुती होणार असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात घटकपक्षांकडून स्वबळासाठीच डावपेच रचले आहेत.

शिराळा : नाराजीची ठिणगी, जुळवाजुळव

शिराळा तालुक्यात भाजपाची धुरा आमदार सत्यजित देशमुख सांभाळत आहेत. मात्र येथे महाडिक गटही सक्रिय आहे. नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष पदाची संधी न मिळाल्याने महाडिक गटात ‌‘मनात साठलेली खदखद‌’ आहे. ही नाराजी दूर करणे हे नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी आ. शिवाजीराव नाईक आणि शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आ. मानसिंगराव नाईक यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र येत ‌‘वेळप्रसंगी शत्रूही सोबती‌’ हे दाखवून दिले. झेडपी निवडणुकीतही ते एकत्र येतील, अशी चर्चा आहे. भाजप आणि शिवसेनेत मात्र येथे एकमत असल्याने पुन्हा युती शक्य आहे.

वाळवा : एकीचा दोर घट्ट केला

वाळवा तालुक्यात वर वर युतीचे सूर जुळत असल्याचे चित्र असले, तरी आतून ‌‘घरात भांडण, बाहेर हसू‌’ अशी अवस्था आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, महाडिक बंधू आणि आ. सदाभाऊ खोत यांच्यात काही प्रमाणात अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जाते. शिवसेनेतही गौरव नायकवडी आणि आनंदराव पवार यांच्यात मनभेद असल्याचे सांगितले जाते. मात्र इस्लामपूर नगरपालिकेत बसलेल्या फटक्यामुळे सर्व नेत्यांनी सावध भूमिका घेतली. युतीमधील सर्व नेत्यांनी तातडीने बैठक घेऊन मतभेद तात्पुरते बाजूला ठेवले. आमदार जयंत पाटील यांना रोखण्यासाठी युतीतील नेत्यांनी ‌‘एकीचा दोर‌’ घट्ट केला आहे. काही ठिकाणी उमेदवार निश्चित करून प्रचारालाही सुरुवात केली आहे.

मिरज : ‌‘ज्याची त्याची वाट... अन्‌‍ घाट‌’

मिरज तालुक्यात युती हा शब्द केवळ चर्चेपुरताच असल्याचे बोलले जाते. भाजपाचे आमदार सुरेश खाडे आणि शिंदे शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्यातील संघर्ष उघड आहे. अस्तित्व दाखवण्यासाठी शिवसेनेकडून स्वबळाची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही खाडे यांचे संबंध ‌‘न धड मैत्री, न धड वैर‌’ अशाच स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या तालुक्यात युतीची वाट बिकट आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाला झेडपीच्या निवडणुकीत सन्मानाची वागणूक दिली जाईल, असा शब्द पालकमंत्री पाटील यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिला आहे. मात्र शब्द पाळला गेला नाही, तर कदम काय भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

तासगाव : बंडाचे वारे

तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी खासदार संजय पाटील आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यातील मतभेद सर्वश्रूत आहेत. पाटील यांना भाजपमधूनही विरोध असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाच्या नाऱ्यावर जोर धरला आहे. त्यामुळे युती टिकवणे हे ‌‘डोंगर ढकलण्यासारखे‌’ आव्हान आहे. शिवसेनेची ताकद येथे नगण्य आहे.

कवठेमहांकाळ : धूसफूस कायम

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खा. संजय पाटील यांच्यामध्ये अंतर्गत धूसफूस आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या भागात लक्ष घातले आहे. आ. गोपीचंद पडळकर गट सक्रिय आहे. आ. पडळकर आणि खा. पाटील यांच्यात संघर्षाचे वारे आजही वाहत आहेत. ‌‘जुना वाद, नवा रंग‌’ अशी अवस्था आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे तालुक्यात युतीची वाट धूसर दिसत आहे. जनसुराज्य शक्ती पक्षात दाखल झालेल्या अनिता सगरे यांची भूमिका काय असणार, हा प्रश्न आहे.

जत : युतीचे दार बंदच

जत तालुक्यात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात ‌‘पाणी पेटवणारा‌’ संघर्ष आहे. भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले असून, जगताप यांनी काँग्रेससोबत युती केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) आणि इतर पक्षांनीही पाठिंबा दिल्याने भाजप स्वतंत्र लढणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे येथे महायुतीची दारे ‌‘कडी लावून बंद‌’ झाल्याचे चित्र आहे.

आटपाडी : दोन गट, दोन वाटा

आटपाडी तालुक्यात भाजपमध्ये देशमुख आणि पडळकर असे दोन गट आहेत. नगरपंचायतीत दोन्ही गट एकत्रित आल्याने भाजपने यश मिळवले. मात्र शिंदे शिवसेनेचे तानाजी पाटील यांचीही मजबूत फौज उभी आहे. पडळकर आणि पाटील यांच्यातील संघर्ष टोकाचाच. नगरपंचायतीप्रमाणे येथेही स्वतंत्र लढतीची शक्यता आहे. त्यामुळे युती होणे जवळपास अशक्य.

खानापूर : पिढीजात वैर

खानापूर तालुक्यात भाजपाचे वैभव पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुहास बाबर पारंपरिक विरोधक. पिढ्यान्‌‍ पिढ्या चालत आलेला संघर्ष आजही कायम आहे. ‌‘जुने वैर, नवा काळ‌’ असे काही झालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र लढण्याचीच भूमिका नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे तालुक्यात युती होणे अशक्य.

कडेगाव-पलूस : इकडे आड, तिकडे विहीर

कडेगाव आणि पलूस तालुक्यात माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपची ताकद वाढवली आहे. मात्र दोघांतील संघर्षामुळे कार्यकर्ते ‌‘इकडे आड, तिकडे विहीर‌’ अशा अवस्थेत आहेत. पलूसमध्ये शरद लाड यांच्या प्रवेशामुळे भाजप बळकट झाला आहे. मात्र युतीपेक्षा अंतर्गत वाद मिटवणे हेच मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची गाठ सैल होत आहे. त्यामुळे स्वबळाचाच खेळ रंगणार असल्याचे बोलले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT