- किरण पाटील
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यातील भाळवणी गट तसेच भाळवणी पंचायत समिती गण व आळसंद पंचायत समिती गण हे तिन्ही मतदारसंघ यंदा खुल्या (सर्वसाधारण) प्रवर्गात गेल्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आमदार सुहास बाबर व उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या नेतृत्वात नुकत्याच झालेल्या विटा नगरपालिकेत शिवसेनेने मिळवलेल्या यशामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भाजपकडूनही आमदार गोपीचंद पडळकर व वैभव पाटील यांनीही या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केल्याने यंदाची निवडणूक महायुतीतीलच शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यात अटीतटीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाळवणी गटामधून शिवसेना शिंदे गटाकडून मंगरूळ येथील विलास रामराव पाटील व आळसंद येथील हिम्मतराव जाधव इच्छुक असून, पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपकडून आळसंद येथील नितीनराजे जाधव व बलवडी येथील प्रवीण पवार यांनी अर्ज दाखल केला असला तरी, नितीनराजे जाधव यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे.
काँग्रेसकडून भाळवणी येथील संभाजी धनवडे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतीक धनवडे, वंचित बहुजन आघाडीकडून जितेंद्र कांबळे, तर अपक्ष म्हणून शीतल बाबर, प्रवीण जाधव, तुषार ठोंबरे, संजय मस्के व माणिकराव शिंदे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या गटातील लढत दुरंगी होणार की तिरंगी, याची चर्चा रंगली आहे. आळसंद पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाकडून कार्वे येथील रोशन जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून बामणी येथील आकाश माने व आळसंद येथील प्रवीण जाधव यांनी उमेदवारी दाखल केली आहे. अपक्ष म्हणून राजकुमार निकम व लालासोा हारूगडेेही रिंगणात आहेत. भाळवणी पंचायत समिती गणातून भाजपकडून मोहन धनवडे व प्रशांत पवार, तर शिवसेनेकडून महेशराव घोरपडे यांनी उमेदवारी दाखल केली असून अपक्ष म्हणून चंद्रकांत चव्हाण, अमोल शिंदे व सागर सूर्यवंशी यांनी अर्ज सादर केले आहेत.