संजय खंबाळे
सांगली ः जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे गावोगावी जोरात वाहू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास आता अवघा एकच दिवस उरलाय. पण गावाकडची राजकीय गाडी रुतली आहे. तहसील कार्यालयाच्या अंगणात सकाळपासून गर्दी, फोनाफोनी, भेटीगाठी आणि चहाच्या टपरीवर चर्चा. ‘तिकीट कुणाला?’ हा एकच विषय. ‘मनी’, ‘मसल’वर ‘टसल’ ठरली जात आहे. ‘प्रसाद’ वाटपाची ऐपत पाहण्यासाठी अनेक पक्षांनी उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.
जिल्हा परिषदेला राजकीय पाठशाला म्हटले जाते. या शाळेत राजकीय धडे घेऊन जिल्ह्यातील अनेकांनी राज्य आणि देशाचे नेतृत्व केले. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सदस्य ते सभापदी, उपाध्यक्ष, अध्यक्ष ही पदे महत्त्वाची आणि कामाची आहेत. या पदांवर राहून अनेकांनी शेकडो लोकांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावल्याचा इतिहास आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे गावातला जणू उत्सवच असायचा. उमेदवार कोण होणार याची चर्चा चावडीवर, वावरात, दळणवळणाच्या वाटेवर व्हायची; तेव्हा ‘हा माणूस गावासाठी काय करतो?’, ‘लोकांच्या सुख-दु:खात उभा राहतो का?’, तसेच पक्षाची निष्ठा, यावर उमेदवारी ठरायची. उमेदवार ठरवताना पक्षाचे वरिष्ठ नेते गावात यायचे, शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी बसून चर्चा करायचे, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली घ्यायची. त्यावेळी ‘शब्दाला’ वजन असायचे. मात्र आजची परिस्थिती बदलली आहे. कालपर्यंत गावासाठी राबणारे, पावसात, उन्हात मतदारांच्या दारात उभे राहणारे कार्यकर्ते आज बाजूला पडलेत. आज अचानक खिशात ‘दम’ असलेले नवे ‘नेते’ पुढे आले आहेत.
अर्जाच्या ओळीत माणसं कमी, हिशेेब जास्त
आज अर्ज भरण्याच्या रांगेत उभा असलेला प्रत्येकजण एकाच हिशेबात गुंतलाय... ‘खर्च किती येईल?’ प्रचारासाठी वाहन, पेट्रोल, कार्यकर्त्यांचा खर्च, सोशल मीडियाची हवा आणि शेवटी लोकांचे ‘मानधन.’ या सगळ्याचा आकडा मांडताना सामान्य कार्यकर्ता गडबडून जातो. नेतेमंडळींकडून देखील उमेदवारी ठरविताना ‘मनी’, ‘मसल’ची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे कर्तृत्ववान आणि निष्ठावान उमेदवार निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडत आहेत. ‘सेवा करायची हौस होती, पण खर्चाचा डोंगर पाहून छाती दडपते,’ अशा काही भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत.
अपक्ष उगवायला लागलेत
जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिकिटाचा घोळ वाढत चालल्याने अपक्ष उमेदवारांचे पीक माजले आहे. ‘आपलं नाही जमलं, तर आपण आपलं बघायचं,’ ही मानसिकता जोर धरतेय. ‘आई-वडिलांची भांडणं झाली की लेकरं वेगळी होतात.’ युती, आघाडी याचेही तसेच चालले आहे.
गडबड, गोंधळ आणि गुपचूप सौदे
उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. या शेवटच्या दिवशी ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचा’ प्रकार होणार, हे नक्की. कुणाचा अर्ज मागे, कुणाचा पुढे, कुणाची माघार, कुणी अचानक मैदानात... हे सगळे काही दिवसात पाहायला मिळणार. सगळेच पुढे, पण रस्ता कुणालाच माहीत नाही. लोकसेवा कमी आणि पैशाची कुस्ती जास्त, अशीच काहींशी अवस्था झाली आहे. ज्याने निवडणुकीत लाखो घातले, ते काढण्यासाठी ‘उद्योग’ करणारंच. त्यामुळे ही व्यवस्था हद्दपार करण्यासाठी मतदारांनीच आता विचार करण्याची गरज आहे. ‘मनी’, ‘मसल’वर ‘टसल’ हे समीकरण मतदारच बदलू शकतात.