Sangli ZP Election: छाननीत 35 उमेदवारांच्या दांड्या गुल  Pudhari Photo
सांगली

Sangli ZP Election: छाननीत 35 उमेदवारांच्या दांड्या गुल

जिल्हा परिषदेसाठी 8, तर पंचायत समितीसाठी 27 जणांचे अर्ज अवैध : 1,647 उमेदवारांचे अर्ज वैध

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत छाननी प्रक्रियेत गुरुवारी 35 उमेदवारांच्या दांड्या गुल झाल्या. जिल्हा परिषदेसाठीचे 8 व पंचायत समितीसाठीचे 27 उमेदवारी अर्ज बाद झाले. जिल्हा परिषदेसाठी 590 व पंचायत समितीसाठी 1,057 असे एकूण 1647 अर्ज मंजूर झाले आहेत. जिल्ह्यात अनेक गट आणि गणात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. मंगळवारी (दि. 27) रोजी अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसात बंडखोरांना रोखणे हे पक्षांच्या नेत्यांसमोर आव्हान असणार आहे.

जिल्हा परिषदेचे 61 आणि पंचायत समितीचे 122 गण आहेत. या गट आणि गणांसाठी निवडणूक सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 16 जानेवारीपासून सुरुवात झाली. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन-चार दिवसात उमेदवारांचा फारसा प्रतिसाद नव्हता. पण शेवटच्या दोन दिवसात अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. शेवटच्या दिवशी विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले.

जिल्हा परिषदेला 746 आणि पंचायत समितीला 1 हजार 289 अर्ज दाखल झाले होते. इच्छुकांची संख्या मोठी आहे. जत, मिरज, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, वाळवा तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. तुलनेत खानापूर, शिराळा तालुक्यात इच्छुकांची संख्या कमी आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याने प्रत्येक गट आणि गणात चुरशीच्या लढती होणार आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या 2 हजार 35 अर्जांची छाननी गुरुवारी तालुका पातळीवर झाली. कडेगाव तालुक्यातील गटात 1 आणि गणात 1 असे 2 अर्ज बाद करण्यात आले. जत तालुक्यात गटात 2 आणि गणात 6 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. खानापूरमध्ये गणात 2, तासगाव तालुक्यात गटात 2, गणात 3, कवठेमहांकाळमध्ये गणात 1, मिरज तालुक्यात गटात 3, गणात 8 असे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 35 उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. जात पडताळणी प्रमाणपत्राची पोहोच नसणे, अपुरी कागदपत्रे तसेच सूचकांची सही नसणे अशा कारणावरून अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. शिराळा, आटपाडी, पलूस तालुक्यांत एकही अर्ज बाद झाला नाही.

महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे युती, आघाडीत फूट पडली आहे. त्यांच्यामध्ये समझोता झाला नाही, तर जिल्ह्यात तिरंगी, चौरंगी लढतीची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित पाच दिवसात इच्छुकांची संख्या कमी करण्यासाठी मनधरणी करावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT