Sangli ZP Election Pudhari
सांगली

Sangli ZP Election : उमेदवारांनी घेतला ‌‘क्रॉस व्होटिंग‌’चा धसका

नाती-गोती, जाती-पाती, गावचा-जवळचा यांचे भांडवल सुरू

पुढारी वृत्तसेवा

संजय खंबाळे

सांगली ः ‌‘तो आपल्या गल्लीतला आहे‌’, ‌‘त्यांच्या पाहुण्यांचं तो ऐकतोय‌’, ‌‘आरं ! हा आपल्या गावचा नाय‌’, ‌‘तो या जातीया हाय‌’, ‌‘त्यानं गेल्या निवडणुकीत दगा दिलाता‌’.... अशी जोरदार चर्चा आज गावा-गावात रंगली आहे. निवडणुकीत नाती-गोती, जात-पात, पक्ष, पैसा, गावचा, परगावचा, जवळच्या उमेदवाराला मोठे महत्त्व येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नात्यांचे ‌‘हत्यार‌’ बाहेर काढण्यात आले आहे. यातून ‌‘क्रॉस व्होटिंग‌’ होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नेतेमंडळींसह उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यंदा आघाडी-युती झाली नाही. भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना यांसह घटकपक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाचा, आपल्या गटाचा, गावचा, भावकीतील उमेदवार कसा निवडून येईल, याकडे लक्ष दिले असल्याचे दिसते. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात विजयासाठी डाव-प्रतिडाव जोरात सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच गर्दी का होते, यामध्ये अनेक उत्तरे लपली आहे.

जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितींच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची गुरुवारी सांगता झाली. मात्र आता छुप्या प्रचाराला वेग येणार आहे. एकीकडे छुपा प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे ‌‘क्रॉस व्होटिंग‌’चा धसका उमेदवार आणि नेत्यांनी घेतला आहे. निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा वैयक्तिक समीकरणे, गावा-गावातील गटबाजी आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळे मतदानाच्या दिवशी मतदार ‌‘मनाप्रमाणे‌’ मतदान करतील, अशी भीती सर्वच पक्षांच्या उमेदवारांना सतावत आहे.

निवडणुकीत सुरुवातीला पक्ष, आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू झाला. त्यानंतर पडद्यामागे खऱ्या राजकीय खेळ्या सुरू झाल्या. प्रत्येक गटात ‌‘आपला माणूस‌’ कसा निवडून येईल, याकडे लक्ष दिले जात असल्याचे बोलले जाते. तसेच निवडणुकीत गावकी-भावकी, पै-पाहुणे, नाती-गोती पुढे करून भावनिक केली जात आहेत. त्यामुळे क्राँस व्होटिंगची शक्यता अधिक बळावते. ग्रामीण भागात नातेसंबंध, जातीय आणि स्थानिक गटांचे वर्चस्व मोठे असते. पक्षाचे चिन्ह दुय्यम ठरून ‌‘गावचा माणूस‌’ किंवा ‌‘आपला उमेदवार‌’ यालाच मत दिले जाते. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी असलेल्या कार्यकर्त्यांकडून विरोधी गटाला गुपचूप मदत केली जाण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.ॉ

प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीसाठी एक अशी दोन मते देण्याचा अधिकार आहे. त्यापैकी एक मत गावाच्या उमेदवाराला आणि दुसरे मत पक्षाच्या उमेदवारास, असाही काही ठिकाणी प्रचार सुरू आहे. यातून क्राँस व्होटिंगचा धोका निर्माण झाला आहे.पक्षाने संधी दिली नसल्याने अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांमध्ये दुभंग निर्माण झाला आहे. यातून कार्यकर्तेच क्रॉस व्होटिंग करतील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ‌‘आपला माणूसच दगा देईल का?‌’ हा प्रश्न उमेदवारांच्या मनात घर करू लागला आहे. दुरंगी - तिरंगी लढतीने अनेक गट आणि गणात निकाल चुरशीचे लागण्याची शक्यता राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत क्रॉस व्होटिंगचा फटका बसल्यास खात्रीशीर वाटणाऱ्या जागाही हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ‌‘सेफ गेम‌’ खेळत सर्वच गटांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उघडपणे कुणावर टीका न करता ‌‘सर्वांचा विकास‌’ अशी भूमिका घेतली जात आहे.

मतदारांना मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर काढणे, शेवटच्या क्षणापर्यंत संपर्क ठेवणे, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करणे यावर भर दिला जात आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी काही ठिकाणी ‌‘सामूहिक बैठका‌’ घेऊन कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेची आठवण करून दिली जात आहे. काही पक्षांनी तर ‌‘बूथनिहाय बांधणी‌’ सुरू केली आहे. विश्वासू कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवून मतदारांची यादी तपासली जात आहे.

‌‘वजनदार‌’ अपक्ष उमेदवार संधी साधण्याच्या तयारीत

जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या काही मतदारसंघात ‌‘वजनदार‌’ अपक्ष उमेदवार उभे राहिले आहेत. हे उमेदवार ‌‘क्रॉस व्होटिंग‌’ची संधी साधण्याच्या तयारीत आहेत. ‌‘पक्षांतील नाराज मतदार आमच्याकडे वळतील,‌’ असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे प्रचारात स्थानिक प्रश्नांवर भर देत पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक संपर्क वाढवला जात आहे. परिणामी अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT