सांगली ः सांगली जिल्हा परिषदेचे 61 गट आणि दहा पंचायत समित्यांच्या 122 गणांमध्ये निवडणूक होणार आहे. आठ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही बंडखोरांना थोपविणे, हेच राजकीय पक्षांसमोर प्रमुख आव्हान असणार आहे.
2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज केली होती. गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे. महापालिका निवडणुकीचा अनुभव पाहता, जिल्हा परिषदेची निवडणूकही तिरंगी, चौरंगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.61 मतदार संघांपैकी 38 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत. त्यामध्ये 19 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 7 गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत, यामध्ये महिलांसाठी 4 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसींसाठी 16 जागा राखीव आहेत, यातील 8 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. ऑक्टोबर महिन्यात आरक्षण सोडत झाल्याने सर्वच गट आणि गणांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. उमेदवारीची माळ गळ्यात पाडण्यासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 18 लाख 18 हजार 719 मतदार आहेत. त्यामध्ये 9 लाख 23 हजार 911 पुरुष, तर 8 लाख 94 हजार 766 महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या 42 आहे. 61 गटांपैकी जत तालुक्यात 9 आणि मिरज व वाळवा तालुक्यात प्रत्येकी 11 मतदारसंघ आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालयाच्या सत्ता स्थापनेसाठी या तालुक्यात राजकीय पक्षांकडून लक्ष केंद्रित केले जाणार आहेत. मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीवरून ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे