सांगली : बांधकाम विभागाच्यावतीने जि. प. अध्यक्ष निवासस्थान अर्थात वसंत बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे 40 ते 50 लाख रुपये खर्च केले जात आहेत. पदाधिकारी आल्यानंतरही हे करता आले असते. मात्र घाईगडबडीत नूतनीकरण कशासाठी केले जात आहे, असा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेत प्रशासकराज येऊन आता पावणेचार वर्षे होत आली. या प्रशासक काळात झालेली अनेक कामे आणि खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप सातत्याने झाला. काही कामांची चौकशी समितीही नेमली, चौकशी समितीने अनियमितता झाल्याचा अहवालही दिला. मात्र याबाबत कारवाईस चालढकलपणा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. करतो, बघतो, अशी उत्तरे मिळत असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानाची सोय वसंत बंगला या ठिकाणी आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. मोक्याच्या ठिकाणची ही जागा असल्याने त्या जागेवर व्यापारी संकुल उभे करावे, अशी चाचपणी सुरू होती. मात्र हा विषय पुढे सरकलाच नाही.
नव्याने येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांसाठीच्या या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम जोरात सुरू आहे. फरशी, कलर व इतर काही किरकोळ कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी मोठी तरतूद आहे. काम पूर्ण होईपर्यंत हे बजेट 60 लाखांपर्यंत जाऊ शकते. सध्याचे काम झाल्यानंतर अंतर्गत फर्निचरसाठी पुन्हा लाखो रुपये खर्च केले जाऊ शकतात. पदाधिकारी आल्यानंतरही या गोष्टी झाल्या असत्या, मात्र अध्यक्षांची निवड होण्यापूर्वीच घाईघाईत हे नूतनीकरणाचे काम का केले जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.