सांगली : कर्नाटकातील चिंचणी येथील मायाक्का देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदान दोन दिवस पुढे ढकलावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, दि. 10 फेबु्रवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे दि. 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसारच गुरुवार, दि. 5 फेब्रुवारीला मतदान होऊन दि. 7 रोजी निकाल लागणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान दि. 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र, हा दिवस चिंचणी यात्रेचा मुख्य दिवस आहे. धनगर समाजासह बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या मायाक्का देवीची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गावांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात्रेसाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांतून सहकुटुंब चिंचणीला जातात. यात्रेनंतर ते गावाकडे परततात. यात्रेचा मुख्य विधी 5 फेब्रुवारी रोजी असून, या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याचदिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे.
भाविक दोन दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परततात. त्यामुळे मतदान किमान दोन दिवस पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. तीन दिवस उशिरा म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. सर्वांचे अहवाल आयोगाला पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, दि. 10 फे बु्रवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. दि. 8 रोजी परीक्षा केंद्र ताब्यात देणे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन दिवस मतदान पुढे ढकलण्याची मागणी अमान्य करण्यात आली आहे. तसे पत्रही राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी काढले आहे. त्यामुळे आता ठरलेल्या वेळापत्रकानुसारच गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.