सांगली ः सभापती निवडीनंतर आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी दादासाहेब कोळेकर, पृथ्वीराज पाटील, सावित्री रवी-पाटील, स्नेहल मोरे यांचा सत्कार केला.   (छाया ः सचिन सुतार)
सांगली

Sangli News : सभापती निवड बिनविरोध; भाजपाची माघार

आघाडी सत्तेत, शिवसेनेला बक्षीस : पृथ्वीराज पाटील, सावित्री रवी-पाटील, स्नेहल मोरे, दादासाहेब कोळेकर सभापती

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या बुधवारी झालेल्या सभापती निवडीत भाजपाने माघार घेतली. आघाडीकडून शिंदे-शिवसेनेला बक्षीस मिळाले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या स्नेहल मोरे, तर समाजकल्याण सभापतिपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दादासाहेब कोळेकर यांची बिनविरोध निवड झाली. विषय समितीच्या सभापती पदावर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सावित्री तमन्नगौडा रवी-पाटील आणि शिंदे-शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत आघाडीने बाजी मारली होती. यानंतर विषय समिती सभापती निवडीबाबत उत्सुकता होती. सभापती निवडीत चमत्कार घडेल, असा भाजपचा दावा होता, पण तसे काही झाले नाही. संख्याबळ विजयापर्यंत पोहोचत नसल्याने भाजपाने अर्ज दाखल केले नाहीत. सभापती निवडीवेळी भाजपच्या सदस्यांनी सभागृहाकडे पाठ फिरवली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास सर्व सदस्य दाखल झाले. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पाटील उपस्थित होतेे. अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, शिंदे शिवसेनेचे जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील हेही दाखल झाले. चर्चेनंतर अर्ज भरण्यावर शिक्कामोर्तब झाले.

सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीकडून अर्ज घेण्यात आले. त्यानंतर साडेअकरा वाजता भाजपने सभापती निवडीसाठी अर्ज घेतले. आघाडीकडून पृथ्वीराज पाटील, सावित्री रवी-पाटील, दादासाहेब कोळेकर, स्नेहल मोरे आणि विजय धेंडे यांचा अर्ज घेण्यात आला, तर भाजपने शोभा खोत, मंजुश्री कांबळे, जयराज पाटील, शिवाजी खिलारे यांच्यासाठी अर्ज नेले. त्यानंतर आघाडीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सावित्री रवी-पाटील, शिंदे-शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील यांचे सभापतिपदासाठी अर्ज दाखल झाले. महिला बालकल्याण समितीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या स्नेहल मोरे, समाजकल्याणसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दादासाहेब कोळेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून अर्ज दाखल झाले नाहीत. दुपारी दोन वाजता सभेत चारही सभापती निवडी बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी जाहीर केले.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी महायुतीकडे 25 सदस्यांचे संख्याबळ होते, तर शिंदे-शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर होते. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सदस्य विनायक मासाळ यांनी युतीच्या बाजूने मतदान केले होते. अध्यक्ष निवडीस गैरहजर असलेले सेनेचे दोन सदस्य आणि राष्ट्रवादीचे मासाळ हे सभापती निवडीला आघाडीच्या बाजूने आले. त्यामुळे भाजप-युतीकडे केवळ 24 सदस्य राहिले. यावेळी अध्यक्ष संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, सामान्य प्रशासनचे प्रमोद काळे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT