सांगली ः सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी सोमवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. एकूण 61 गटांपैकी 38 गट सर्वसाधारण अर्थात खुले झाले. त्यापैकी 19 गट महिलांसाठी राखीव आहेत. 7 गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून यामध्ये महिलांसाठी 4 जागा राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 16 गट राखीव असून यापैकी 8 गट महिलांसाठी आरक्षित आहेत. सोडतीत मतदारसंघ आरक्षित झाल्याने अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला. नव्याने काढलेल्या आरक्षण सोडतीमध्ये नव्या चेहर्यांना संधी मिळणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. काही गटांमध्ये आरक्षण कायम राहिल्याने विद्यमान सदस्यांना पुन्हा लॉटरी लागली.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, तहसीलदार लीना खरात उपस्थित होत्या.राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेची पहिलीच निवडणूक झाल्याप्रमाणे आरक्षण सोडत चिठ्ठ्या टाकून काढण्यात आली. आरक्षण सोडत काढताना आतापर्यंत झालेल्या आरक्षण सोडतीचा विचार केला नाही. रियांश कांबळे, शौर्य कांबळे आणि अभिज्ञा कांबळे या भावंडांच्याहस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.
अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षण निश्चितीसाठी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने 7 गट निश्चित केले होते. या 7 गटांपैकी गट 4 चिठ्ठ्या टाकून महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 16 जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यापैकी 8 जागा महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत. अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गाची सोडत झाल्यानंतर उर्वरित 38 जागा खुल्या राहिल्या. त्यापैकी 19 जागा सर्वसाधारण महिलांसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या.
बागणी, पणुंब्रे तर्फ वारूण, निंबवडे, वाटेगाव, नागनाथनगर (नागेवाडी) जाडरबोबलाद, दुधोंडी, एरंडोली, कासेगाव, रेठरेहरणाक्ष, वांगी, डफळापूर, वाकुर्डे बुद्रुक, संख, लेंगरे, येलूर, करंजे, आरग, देशिंग.
कामेरी, दरीबडची, बनाळी, भोसे, भाळवणी, भिलवडी, मांजर्डे, बावची, कोकरूड, खरसुंडी, कसबे डिग्रज, येळावी, मणेराजुरी, चिंचणी, चिकुर्डे, करगणी, मांगले, कुंडल, विसापूर.
61 गटांपैकी 16 गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. हे मतदारसंघ असे ः देवराष्ट्रे (महिला), पेठ (महिला), बिळूर (महिला), कडेपूर (महिला), कवठेपिरान (महिला), तडसर (महिला), बुधगाव (महिला), बोरगाव (महिला), शेगाव, दिघंची, मुचंडी, कुची, ढालगाव, वाळवा, अंकलखोप, समडोळी.
लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जातीसाठी सात मतदारसंघ चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये 7 पैकी 4 गट मिरज तालुक्यातील आहे. म्हैसाळ (एस), मालगाव, कवलापूर, बेडग असे चार मतदारसंघ अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले, तर रांजणी, उमदी आणि सावळज हे गट अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले.
आरक्षण सोडतीची अधिसूचना काल, मंगळवारी जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. गट आणि गणांच्या आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 14 ते 17 ऑक्टोबर अशी मुदत आहे. जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीवर जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीवर हरकती असल्यास संबंधित तहसील कार्यालयात हरकती, सूचना दाखल करता येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आलेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी दि. 27 पर्यंत विभागीय आयुक्तांकडे अभिप्रायासह गोषवारा सादर करतील. प्राप्त हरकती व सूचनांच्या आधारावर 31 ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त अंतिम निर्णय देतील. तीन नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी अंतिम आरक्षण प्रसिद्ध करतील.