झेडपी अध्यक्ष, सभापतींची निवड 20 मार्चपूर्वी 
सांगली

Sangli News : झेडपी अध्यक्ष, सभापतींची निवड 20 मार्चपूर्वी

ग्रामविकास विभागाचे आदेश ः जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार; राजकीय हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः गेल्या 16 दिवसांपासून रखडलेली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांची निवड प्रक्रिया अखेर मार्गी लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतींची निवड करून पहिली बैठक दि. 20 मार्चपूर्वी घ्या, असे आदेश ग्रामविकास विभागाने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना काढले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकरच निवड कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना गती येणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दि. 7 फेब्रुवारीरोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवार, दि. 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. मात्र कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदांसाठी राजकीय समीकरणांची चुरस वाढली आहे. प्रमुख पदांसाठी सर्वंच पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली होती. राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू होत्या. मात्र निवडीचा कार्यक्रम घोषित झाला नाही. त्यामुळे सर्वत्र अस्वस्थता होती. त्यातच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळे अध्यक्ष, सभापतींची निवडी अधिवेशनानंतर होईल, अशीही चर्चा होती. दरम्यान, राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती निवड करण्यासाठी संबंधित सदस्यांची बैठक घेणे आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्र शासनांतर्गत ग्रामविकास विभागाने बैठकीबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे नियोजित कालावधीत बैठक घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दि. 20 मार्च 2026 पूर्वी पहिली बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यक्ष, सभापती निवडीच्या कार्यक्रमाचीघोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा पंचायत समितीच्या सभापती निवड होतील, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होईल.

दरम्यान, पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमाची कधीही घोषणा होऊ शकते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे. शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार पक्ष) काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT