सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिंदे शिवसेनेशी संपर्क साधला जात आहे. मात्र शिवसेनेने आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. आमदार सुहास बाबर सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि पाठिंब्याबाबत ते चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत आज, रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत प्रस्ताव ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनाही सत्तेसाठी आवश्यक बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे. भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. महायुतीच्या माध्यमातून भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 30 सदस्यांचे बलाबल आहे. त्यांना सत्तेसाठी अवघ्या एका जागेची गरज आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादीसह शिवसेनेला सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
शिवसेनेकडे सात जागा आहेत. त्यामुळे भाजप आणि आघाडीकडून शिवसेनेशी संपर्क साधला जात आहे. आ. बाबर यांच्याशी दोन्ही गटाचे नेते संपर्क साधत आहेत, मात्र शिवसेनेकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. निवडणुकीत खानापूर आणि आटपाडी तालुक्यात शिवसेनेला जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला होता, त्यामुळे भाजप नेत्यांविषयी नाराजी असल्याचे शिवसेनेच्या काही नेत्यांनी सांगितले.
शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यापूर्वी आ. बाबर हे उपमुख्यमंत्री शिंदे यांची सोमवारी अथवा मंगळवारी भेट घेणार आहेत. दरम्यान, सत्तेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने अध्यक्ष पदाचा दावा केला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची रविवारी मुंबईत बैठक होईल. कुणाचा पाठिंबा घ्यावयाचा, सत्तास्थापनेसाठी सहभागी पक्षांबाबत कोणती भूमिका घ्यायची, याबाबत रविवारी खासदार विशाल पाटील, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजित कदम यांची बैठक होणार आहे.
आ. जयंत पाटील-शिवाजीराव नाईक यांच्यात गुप्त बैठक
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय उपाध्यक्ष आणि सभापती पदांबाबतही चर्चा झाल्याचे समजते.