ऐतवडे बुद्रुक : ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना जोर येत असतानाच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. विविध कार्यक्रमांत इच्छुकांचे फेरे वाढले होते. मात्र अचानक नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या आशेवर पाणी फेरल्याचे चित्र निर्माण झाले असून, इच्छुकांचा उत्साह कमी झाला आहे.
त्याउलट शहरांमध्ये निवडणूक तापमान वेगाने वाढताना दिसते. जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणजे ग्रामीण राजकारणाचा मुख्य धागा. गावपातळीपासून राजकीय प्रगतीची ही मोठी पायरी असल्याने नव्या-जुन्या इच्छुकांकडून जोमात तयारी होत होती. मात्र नगरपालिकांच्या निवडणुका आधी जाहीर झाल्याने गट-सर्कल तसेच गणांमध्ये काहीशी शांतता दिसून येत आहे. चिकुर्डे, कामेरी जिल्हा परिषद गट व गणात उमेदवारीच्या चर्चाना वेग आला होता. पूर्वी फक्त एका नावावर चर्चा सुरू असताना, आता मात्र पक्षांतर्गतच स्पर्धा स्पष्टपणे जाणवत आहे.
भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष एकत्र येण्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे), काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तसेच वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी दर्शविली आहे. महायुती-महाविकास आघाडीत युतीबाबत संभ्रम कायम असून, कोण कोणासोबत जाणार याचा निर्णय सोय पाहून होईल, असे संकेत मिळत आहेत.