Sangli ZP Election Pudhari
सांगली

Sangli ZP Election : प्रचार नवा, समस्या मात्र जुन्याच

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील चित्र

पुढारी वृत्तसेवा

रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यामध्ये गावोगावी प्रचारसभा, कोपरा बैठकांचा धडाका सुरू आहे. समाजमाध्यमांवरूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि आश्वासनांची बरसात सुरू आहे. अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असली, तरी प्रचारात मांडल्या जाणाऱ्या समस्या मात्र वर्षानुवर्षे त्याच-त्या आहेत.

रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीजपुरवठ्याची अनियमितता, आरोग्य केंद्रांची अपुरी सुविधा, शाळांतील शिक्षकांची कमतरता, शेतीसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न, हे मुद्दे पुन्हा एकदा प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. मागील निवडणुकांतही याच समस्या मांडल्या गेल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात फारसा बदल झालेला दिसत नाही, अशा भावना नागरिकांमध्ये आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदार फक्त शब्दांवर नाही, तर कामाची खात्री देणाऱ्यालाच पसंती देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कडेगाव तालुक्यात वांगी, तडसर, कडेपूर व देवराष्ट्रे, असे चार जिल्हा परिषदेचे गट आहेत, तर तडसर, शाळगाव, कडेपूर, हिंगणगाव बुद्रुक, वांगी, नेवरी, देवराष्ट्रे आणि चिंचणी, असे आठ पंचायत समिती गण आहेत. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय ए, मनसे तसेच इतर पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. परंतु खरा सामना काँग्रेस विरुद्ध भाजपमध्येच आहे.

मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसतशी निवडणुकीत रंगत वाढताना दिसत आहे. आरोप -प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू झाल्या आहेत. यंदाच्या प्रचारात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला असला तरी जमिनीवरील प्रश्नांची उत्तरे देताना उमेदवारांची कसरत होताना दिसत आहे. ‌‘सत्ता मिळाल्यावर सर्व प्रश्न सोडवू‌’ अशी आश्वासने दिली जात आहेत, पण ठोस आराखडा व कालबद्ध अंमलबजावणीबाबत मात्र मौन पाळले जात आहे.

ग्रामस्थांमध्येही आता केवळ भाषणांवर नव्हे, तर कामावर विश्वास ठेवण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. ‌‘यावेळी तरी बदल होणार का?‌’ असा सवाल मतदार विचारू लागले आहेत. काही ठिकाणी युवक आणि महिलांचे प्रश्न मांडले जात असले तरी त्याला कृतीची जोड मिळेल का, याबाबत साशंकता आहे. एकीकडे प्रचारात नवे चेहरे, नवी भाषाशैली आणि आधुनिक साधनांचा वापर दिसत असला, तरी दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील मूलभूत प्रश्न अजूनही ‌‘जैसे थे‌’ आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार फक्तशब्दांवर नाही, तर कामाची खात्री देणाऱ्यालाच पसंती देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT