Sangli ZP Pudhari
सांगली

Sangli ZP: स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा

हरकतींसाठी ३० दिवसांची मुदत : झेडपीत ६, तर पं. समित्यांत २६ सदस्य वाढण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला. शासनाने यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवल्या असून त्यासाठी ३० दिवसांची मुदत आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेत ६, तर दहा पंचायत समित्यांमध्ये एकूण २६ स्वीकृत सदस्यांची नियुक्तीची शक्यता आहे. या नियुक्त्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय समीकरणांनाही नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

नवीन तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के किंवा किमान पाच व्यक्ती, यांपैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेत ६१ सदस्य असून ६ स्वीकृत सदस्यांची भर पडल्यास सदस्यसंख्या ६७ होईल.

पंचायत समित्यांसाठी एकूण सदस्यसंख्येच्या २० टक्के किंवा किमान एक व्यक्ती, यांपैकी जी संख्या अधिक असेल तेवढे स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचे सूत्र निश्चित आहे. त्यानुसार दहा पंचायत समित्यांमध्ये एकूण २६ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती अपेक्षित आहे. स्वीकृत सदस्यांचे पक्षनिहाय वाटप संबंधित संस्थेतील निवडून आलेल्या सदस्यसंख्येच्या प्रमाणात होणार आहे. शासनाने त्यासाठी स्पष्ट गणिती पद्धत निश्चित केली आहे.

प्रथम पूर्णांकाच्या आधारे जागा वाटप केले जाईल. त्यानंतर उर्वरित जागा संबंधित पक्षांच्या अपूर्णांकाच्या उतरत्या क्रमाने दिल्या जातील. दोन किंवा अधिक पक्षांचे अपूर्णांक समान आल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढून अंतिम निर्णय घेतला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT