परीक्षा केंद्रांवर थेट मोबाईलद्वारे वॉच 
सांगली

Sangli News : परीक्षा केंद्रांवर थेट मोबाईलद्वारे वॉच

सीईओ विशाल नरवाडे ः कॉपीमुक्त अभियानांतर्गत लाईव्ह रेकॉर्डिंग ः राज्यात पहिलाच उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

सांगली ःजिल्हा परिषदेतर्फे कॉपीमुक्त अभियानाचा नावीन्यपूर्ण प्रयोग राबवण्यात येत आहे. परीक्षेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यात जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांवर डिजिटल वॉच ठेवण्यात येत आहे. राज्यात हा प्रयोग राबवणारा सांगली हा पहिलाच जिल्हा ठरल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, उपशिक्षणाधिकारी गीता शेंडगे, अधीक्षक अरुणा कोले, अधीक्षक नारायण माळी, अधीक्षक धनंजय जाधव उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्यावतीने 1 हजार 307 पर्यवेक्षकांच्या मोबाईलद्वारे झूम लिंक वापरून जिल्हास्तरावरून केंद्रिकृत पद्धतीने लाईव्ह रेकॉर्डिंग करत परीक्षा घेतली जात आहे. मंगळवारी पहिल्या पेपरपासून या उपक्रमाची सुरुवात झाली. ही व्यवस्था 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर हे लाईव्ह रेकॉर्डिंग केले जाणार आहे. यामुळे परीक्षांमध्ये 100 टक्के पारदर्शकता येणार आहे. या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे, ‌‘परीक्षेत कॉपी होणारच‌’ हा पालक, विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील प्रशासनाबाबतचा नकारात्मक दृष्टिकोन बदलणे हा आहे. विशेष म्हणजे, 2019 पासून हा उपक्रम सांगली जिल्ह्यात सातत्याने राबवला जात आहे. यावर्षी यासंदर्भात लेखी शासन आदेश आणि मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा राज्यात हा प्रयोग प्रभावीपणे आणि शिस्तबद्धरीत्या राबवणारा एकमेव जिल्हा ठरत आहे.

विद्यार्थ्यांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. कोणाचेही शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, हा प्रशासनाचा मुख्य हेतू आहे. किरकोळ चुका झाल्यास समज देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती विशाल नरवाडे यांनी दिली शिक्षणाधिकारी लोंढे म्हणाले, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे महत्त्वाचे आहे. या पारदर्शक व संवेदनशील भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती न निर्माण होता विश्वासाचे वातावरण तयार होणार असून, कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबवले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT