‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम . Pudhari File Photo
सांगली

‘माझी वसुंधरा’मध्ये झेडपी राज्यात प्रथम

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली आहे. तसेच जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींनी विविध गटांत यश मिळविले आहे. राज्यात देण्यात आलेल्या 130 बक्षिसांपैकी 18 बक्षिसे जिल्ह्याला मिळाली आहेत. एकूण बक्षिसाची रक्कम सुमारे 9 कोटी 20 लाख आहे. मुंबईत लवकरच मान्यवरांच्याहस्ते सर्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्त्वावर आधारित हे अभियान घेण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. 2 ऑक्टोबर 2020 पासून या अभियानाची सुरुवात झाली. ‘माझी वसुंधरा अभियान - चार’ हे 1 एप्रिल 2023 ते दि. 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. अभियानात सर्व ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम आली आहे.

ग्रामपंचायत गटामध्ये दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कासेगाव (ता. वाळवा) ग्रामपंचायतीने 1 कोटी 25 लाख मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच राज्यस्तर उत्तेजनार्थ पुणे विभागात येळावी (ता. तासगाव) आणि कवलापूर (ता. मिरज) या ग्रामपंचायतींने कामगिरी केली आहे. पाच हजार ते दहा हजार लोकसंख्या गटामध्ये येडेनिपाणी (ता. वाळवा) ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे. तसेच भूमी थिमॅटिकमधील उच्चतम कामगिरीमध्ये ही ग्रामपंचायत प्रथम आली आहे. या ग्रामपंचायतीला एकूण 2 कोटी 25 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. राज्यस्तरावर उत्तेजनार्थ वाटेगाव (ता. वाळवा), समडोळी (ता. मिरज) या दोन ग्रामपंचायतीने कामगिरी केली आहे. विभागस्तरावर वसगडे (ता. पलूस) व नागठाणे (ता. वाळवा) या दोन ग्रामपंचायतींनी कामगिरी केली आहे. अडीच हजार ते पाच हजार लोकसंख्या गटामध्ये नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) ही ग्रामपंचायत राज्यात प्रथम आली आहे. या ग्रामपंचायतीला एकूण 1 कोटी 50 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. तसेच पुणे विभागामध्ये बोरगाव व घाटनांद्रे या ग्रामपंचायतींनी बक्षीस मिळविले आहे.

भूमी थिमॅटिकमध्ये उंचउडी प्रकारात लंगरपेठ (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायत उत्तेजनार्थ आली आहे. पुणे विभागामध्ये बनेवाडी व खंडोबाचीवाडी या दोन ग्रामपंचायती क्रमांकात आल्या आहेत. भूमी थिमॅटिकमधील उच्चतम कामगिरीमध्ये पुणे विभागामध्ये कुंडलापूर व कौलगे या दोन ग्रामपंचायतींचा क्रमांक आला आहे. हे अभियानामध्ये सर्व पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी, विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT