उद्धव पाटील
सांगली : जिल्हा परिषदेच्या 61 पैकी 60 जागांचे निकाल जाहीर झाले होते. एकट्या मणेराजुरी मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) या तीन पक्षांच्या जागांची बेरीज 30 पर्यंत येऊन थबकली होती. मणेराजुरीचा निकाल काय लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. खरे तर हा मतदारसंघ माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांचा बालेकिल्ला. त्यामुळे ही जागा राष्ट्र्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला मिळणार आणि जिल्हा परिषदेत आघाडी सत्ता स्थापन करणार, अशी अटकळ होती; पण ही जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने जिंकली आणि आघाडीच्या बहुमताला ब्रेक लागला. क्रिकेटमध्ये शेवटचे षटक, शेवटचा चेंडूही जसा महत्त्वाचा असतो, तसे राजकारणात एक-एक जागाही किती महत्त्वाची असते, याचा प्रत्यय यावेळी आला.
सोमवारी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. कल आणि निकाल पुढे येऊ लागले. जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, हे स्पष्ट होत होते. या निवडणुकीत भाजपला झटका बसणार, गेल्यावेळच्या जागांची संख्या राखता येणार नाही, हेही स्पष्ट होत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची स्थिती सुधारणार, हे दिसू लागले होते. पलूस, कडेगावमध्ये काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केला होता. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष वाळवा, शिराळा, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात चमकदार कामगिरी करत होता. राष्ट्रवादी अजित पवार पक्षही काही जागांवर आघाडीवर होता. शिवसेनाही खानापूर, आटपाडीत मुसंडी मारत होती. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती किंवा आघाडी झाली नाही. सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले; पण सत्तेसाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हेही दिसत होते.
चार जागांचे निकाल उरले अन्...
पलूस तालुक्यातील भिलवडी, आटपाडी तालुक्यातील निंबवडे, तासगाव तालुक्यातील चिंचणी आणि मणेराजुरी या मतदारसंघांचे निकाल अजून लागायचे होते. उर्वरित 57 जागांचे निकाल लागले होते. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला 17, भाजपला 15, काँग्रेसला 10, शिवसेनेला 7, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 5, शिवसेना (उबाठा) ला 1, जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 आणि रयत क्रांतीला 1 जागा मिळाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.) आणि
शिवसेना (उबाठा) या तीन पक्षांच्या जागांची बेरीज 28 झाली होती. अजून चार जागांचे निकाल बाकी होते. पलूसमध्ये काँग्रेसने तीन जागा जिंकल्या होत्या. भिलवडी मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. ही जागाही काँग्रेसला मिळणार, अशी अटकळ होती. मतमोजणीची फेरी पुढे जाईल, तसे त्यावर शिक्कामोर्तब होत होते. अखेर भिलवडीची जागा काँग्रेसला मिळाली. तासगाव तालुक्यातील चिंचणी मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा विजय झाला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे संख्याबळ 30 झाले.
दोन निकाल बाकी अन् बहुमताची प्रतीक्षा
आघाडीला बहुमतासाठी एक जागा बाकी होती आणि दोन जागांचे निकाल अजून यायचे होते. आटपाडी तालुक्यातील निंबवडे आणि तासगाव तालुक्यातील मणेराजुरी हे ते दोन मतदारसंघ. निंबवडे हा मतदारसंघ हाय व्होल्टेज लढतींपैकी नंबर वन होता. त्याची मतमोजणी सुरू होती. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यात काटा लढत झाली होती. साऱ्या जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालाकडे लागले होते. त्याचबरोबर तासगाव तालुक्यातील मणेराजुरीचा निकाल काय येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मणेराजुरी हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा बालेकिल्ला. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्या पाठीशी हा मतदारसंघ नेहमीच राहिलेला आहे. त्यामुळे यावेळीही आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचा उमेदवार निवडून येणार आणि जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उबाठा) यांची सत्ता येणार, असे चित्र राजकीय कॅनव्हासवर तयार होऊ लागले होते. साऱ्या जिल्ह्याचे लक्ष निंबवडे आणि मणेराजुरीच्या निकालाकडे लागले होते.
निंबवडे भाजपाकडे पण...
तेवढ्यात निंबवडेचा निकाल लागला. तेथे भाजपच्या माधवी पडळकर विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार ॲड. विद्या मोटे यांचा पराभव केला. भाजपचे संख्याबळ 16 झाले. पण सत्तास्थापनेसाठी खरा निकाल मणेराजुरीचा येणे बाकी होते.