सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : पाठिंबा कोणाला? अजून शिक्कामोर्तब होईना

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील बैठकीत ठोस निर्णय नाही ः मुंबईतून होणार निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. पाठिंबा कोणाला द्यायचा, याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष, शिवसेनेकडून शिक्कामोर्तब झालेला नाही. सत्ता स्थापनेबाबत सर्वंच राजकीय पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. अध्यक्ष, सभापती निवडीचा कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सत्ता स्थापनेला गती येण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मिळाल्या. त्यापाठोपाठ भाजपला 16, काँग्रेसला 11, शिंदे शिवसेनेला 7, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 6 जागा मिळाल्या, तर जनसुराज्य, शिवसेना (उबाठा) आणि रयत क्रांती पक्षाला प्रत्येकी 1 जागा मिळाली. सत्तास्थापनेला आवश्यक असलेले 31 चे संख्याबळ युतीकडे आहे, तर महाविकास आघाडीला केवळ एका जागेची गरज आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदे शिवसेना यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदे शिवसेना यांचा पाठिंबा सत्तेसाठी महत्वाचा ठरणार आहे.

युती, आघाडीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष आणि शिंदे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत, मात्र राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे. काहीजण युतीसोबत, तर काहीजण आघाडीसोबत जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पाठिंब्याबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी जिल्ह्यातील नेते लवकरच मुंबईत बैठक घेणार आहेत. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आटपाडी, खानापूर आणि वाळवा तालुक्यात शिवसेनेचे 7 सदस्य निवडून आले आहेत. मात्र स्थानिक स्तरावर भाजपसोबत नेत्यांचा राजकीय संघर्ष असल्याने युतीसोबत जाण्यास कार्यकर्त्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. आमदार सुहास बाबर पुढील दोन-तीन दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT