सांगली : जत येथील 'डिलिव्हरी लिमिटेड' पार्सल कंपनीचे ऑफिस फोडून १ लाख ५२ हजार रुपयांची रोकड लांबवणाऱ्या वैभव बबन जाधव (वय २५, रा. ढोसेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) या चोरट्याला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नागज फाटा येथे अटक केली. दरम्यान, त्याचा साथीदार व रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असलेला वडील बबन सर्जेराव जाधव हा अद्याप फरार आहे.
दि. २४ मेच्या रात्री जत येथील पार्सल ऑफिसचे शटर उचकटून ही चोरी झाली होती. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीचे पथक जत भागात पेट्रोलिंग करत असताना, संशयित तरुण नागज फाट्यावर येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार सोमनाथ गुंडे व अमर नरळे यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून वैभव जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्या सॅकची झडती घेतली असता १ लाख ५२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.
या गुन्ह्यातील फरार आरोपी बबन जाधव याच्यावर महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये कुरिअर आणि पार्सल कार्यालये फोडल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. ही कारवाई निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांच्या पथकाने केली.