सांगली

Sangli Murder Case: सांगलीत थरारक पाठलागाने तरूणाचा हत्या

कृष्णा काठावर थरार : कोयत्याचे नऊ वार; आठ हल्लेखोरांसह गुंडांच्या टोळीचे कृत्य

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरातील स्वामी समर्थ घाटावर तरुणाचा थरारक पाठलाग करून त्याची क्रूर हत्या करण्यात आली. चैतन्य देवा तोरणे (वय २०, रा. टिंबर एरिया, सांगली) असे त्याचे नाव आहे. चैतन्य याच्यावर कोयत्याने सपासप नऊ वार करण्यात आले. नामचीन गुंडांच्या टोळीतील ७ ते ८ जणांनी ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर संशयितांच्या घरावर दगडफेक झाल्याने शहरात काही काळ तणाव होता.

टिंबर एरियामध्ये असणार्‍या एका नामचीन गुंडाच्या टोळीसोबत चैतन्य तोरणे याच्या नातेवाईकांचा वाद सुरू होता. यातून वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकमेकांच्या टोळीत आठ दिवसांपासून वाद व धुसफूस सुरू होती. चैतन्य हा वाढपीकाम करत असे. मंगळवारी सायंकाळी तो स्वामी समर्थ घाटावर गेला होता. याची माहिती नामचीन टोळीतील गुंडांना मिळाली होती. त्यानुसार टोळीतील सात ते आठ जणांनी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी हातात कोयते घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला.

गुंडांच्या टोळीला पाहून चैतन्यने पलायन करण्याचा प्रयत्न केला; परंतु टोळीने त्याचा थरारक पाठलाग करून हल्ला चढविला. चैतन्य याच्या तोंडावर, पोटावर, पायावर, डोक्यात कोयत्याने नऊ वार करण्यात आले. अचानक हल्ला झाल्याने चैतन्य याला काही समजण्याच्या आत त्याची हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

दरम्यान, आयर्विन पुलावरून जाणार्‍या एका बिट मार्शलने ही घटना पाहिली. त्यानंतर तातडीने सांगली शहर पोलिस ठाण्याला याबाबत माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे संजीव झाडे, सांगली शहर पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सांगली शहर, स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली आहेत.

हत्येची माहिती मिळाल्यानंतर चैतन्यच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत चैतन्यला शवविच्छेदन करण्यासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी या ठिकाणी चैतन्यच्या हत्येमुळे संतापलेल्या नातेवाईकांनी थेट टिंबर एरियामधील संशयितांचे घर गाठले. यावेळी एका संशयिताच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये संशयिताच्या घराच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे टिंबर एरियामध्ये तणाव होता.

विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव दंगल नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तणाव कमी झाला. चैतन्य आणि संशयितांच्या घराजवळ दंगल नियंत्रण पथकासह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. दरम्यान, पूर्ववैमनस्य, टोळीयुद्ध व वर्चस्ववादातून चैतन्यची हत्या क्रूरपणे केल्याने सांगलीत टोळीयुद्धाचा भडका उडाल्याचे स्पष्ट झाले.

चैतन्यची हत्या शहरातील एका नामचीन टोळीने केल्याचे समोर आले आहे. त्या टोळीचा म्होरक्या या खुनाच्या कटात सहभागी आहे का? यादृष्टीने देखील सांगली शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्ला करणार्‍या टोळीतील काहीजण हद्दपार होते. हद्दपारीनंतर आल्यानंतर काही दिवसांतच गुुंडांनी ही हत्या केली आहे. तसेच टोळीच्या म्होरक्यावर यापूर्वी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT