सांगली

Sangli News : गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुण ‘टेंभू’च्या प्रवाहात बेपत्ता

हिंगणगाव बुद्रुक तलावातील घटना; रात्री उशिरापर्यंत शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव शहर : गणेश विसर्जनासाठी तलावात गेलेला हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव) येथील अभिजित सुनील कदम (वय २५) हा तरुण टेंभू योजनेच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही अभिजितचा शोध लागला नाही. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणगाव बुद्रुक येथे घरगुती गणपती विसर्जनासाठी अभिजितसह काही तरूण तलावाकडे गेले होते. दरम्यान, टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात आल्यामुळे तलाव परिसरात पाण्याचा प्रवाह वेगाने सुरू आहे. या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अभिजित अचानक पाण्यात ओढला गेला आणि वाहून गेला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाला माहिती देऊन अभिजितचा शोध घेण्यासाठी सांगली, कराड तसेच औदुंबर येथून विशेष शोध पथके बोलावण्यात आली. पाण्याचा वेग आणि तलावातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत होते; तरीही शोध पथकांकडून बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरूच होती.

घटनेची माहिती मिळताच कडेगावचे तहसीलदार अजित शेलार, नायब तहसीलदार महेश अनारसे तसेच कडेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक तोरडमल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. संपूर्ण शोधमोहीमेवर प्रशासन व पोलिसांकडून थेट लक्ष ठेवण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत अभिजितचा शोध लागला नव्हता. गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT