Mhaisal Canal 
सांगली

Mhaisal Canal Drowning : म्हैसाळ कालव्यात मोटार कोसळून तरुण बेपत्ता

झुरेवाडी हद्दीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : शहराजवळ झुरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात मोटार कोसळून एक तरुण वाहून गेला. ही घटना मंगळवार, दि. २५ रोजी मध्यरात्री घडली. प्रसाद जाधव (वय ३५, रा. कवठेमहांकाळ) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, बुधवारी उशिरापर्यंत ‘स्पेशल रेस्क्यू फोर्स’च्या पथकाकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद जाधव हे मोटारीतून कवठेमहांकाळच्या दिशेने जात होते. झुरेवाडी हद्दीतील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्याजवळ त्यांचा ताबा सुटल्याने मोटार कालव्यात कोसळली. मोटार पाण्यात पडल्यानंतर प्रसाद मोटारीतून बाहेर पडल्याचे काही स्थानिकांनी पाहिले; मात्र कालव्यातील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते पाण्यात वाहून गेले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार कालव्यात पडताच चालकाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठी आरडाओरडही केला; मात्र अंधार आणि पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे स्थानिकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. काही नागरिकांनी मदतीचे प्रयत्न केले; मात्र त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. 'स्पेशल रेस्क्यू फोर्स'चे सीनिअर कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे, सागर जाधव, लहू घोरपडे आणि इर्शाद कवठेकर यांच्यासह पथकातील सदस्यांनी कालव्यात शोधमोहीम हाती घेतली आहे.

अनेक तासांच्या प्रयत्नानंतर कालव्यातून मोटार बाहेर काढण्यात यश आले; मात्र वाहनामध्ये प्रसाद जाधव आढळून आले नाहीत. त्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.­

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT