पलूस : बुर्ली (ता. पलूस) येथे घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का लागून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. १९ जून रोजी घडली. किरण भाऊसाहेब फाटक (वय २६, रा. बुर्ली, ता. पलूस) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण फाटक हा आपल्या नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारत होता. यावेळी अचानक त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. ही घटना निदर्शनास येताच मित्र अभिषेक पाटील याने गंभीर अवस्थेत किरणला तातडीने उपचारासाठी पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाकडून पलूस पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पलूस पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस तपास करीत आहेत. होतकरू तरूणाच्या आकस्मिक मृत्यूने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती.