Death Case  Pudhari
सांगली

Sangli Accident: विहीर खोदाईदरम्यान दगड कोसळून तरुणाचा मृत्यू

कंत्राटदारासह चालकावर गुन्हा : तिघे कामगार जखमी

पुढारी वृत्तसेवा

जत : कागनरी (ता. जत) येथे विहीर खोदाईचे काम सुरू असताना दगड कोसळून 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवत उमदी पोलिस ठाण्यात कंत्राटदार आणि पोकलँड चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कागनरी येथील एका शेतात सध्या विहीर खोदाईचे काम सुरू आहे. कर्नाटकातील बसवन बागेवाडी येथील कंत्राटदार लक्ष्मण मेघू लमाणी यांनी हे काम घेतले होते. सोमवारी काम सुरू असताना विहिरीच्या कडेचा एक भलामोठा दगड अचानक खाली कोसळला. हा दगड थेट अभिषेक लक्ष्मण लमाणी (वय 18, रा. उपळणी तांडा, जि. विजयपूर) याच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत डोक्याला गंभीर इजा झाल्याने अभिषेकचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत अन्य तीन कामगारही जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विहिरीचे काम अत्यंत धोकादायक स्थितीत सुरू असताना कामगारांना हेल्मेट किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने पुरवण्यात आली नव्हती, असा आरोप फिर्यादी गोपाळ महादेव लमाणी यांनी केला आहे. कंत्राटदार लक्ष्मण लमाणी आणि पोकलँड चालक अरविंद लक्ष्मण लमाणी यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उमदी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT