कडेगाव शहर : येरवडा खुले कारागृहातून पलायन करून पोलिसांना चकवा देणाऱ्या खुनातील जन्मठेपेच्या आरोपीला कडेगाव पोलिसांनी अत्यंत शिताफीने जेरबंद केले आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (वय 40, रा. लक्ष्मीनगर, पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. तो 2017 मधील खुनाच्या गंभीर गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 मे रोजी सायंकाळी येरवडा खुले कारागृहातून ‘जेवणाचा डबा घेऊन येतो’, असे सांगून संतोष भिंगारे हा पसार झाला होता. त्यानंतर पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांत त्याचा कसोशीने शोध सुरू होता. या घटनेमुळे कारागृह प्रशासनासह पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली होती.
सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश कोकाटे यांनी विशेष पथक तयार केले होते. गोपनीय माहितीच्या आधारे भिंगारे हा शिवणी फाटा परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून अत्यंत धाडसी व नियोजनबद्ध कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.