संभुआप्पा उरूसानिमित्त ३ डिसेंबरला कुस्ती मैदान 
सांगली

Sangli News : संभुआप्पा उरूसानिमित्त ३ डिसेंबरला कुस्ती मैदान

१०० हून अधिक कुस्त्यांचा थरार; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे; पहिल्या कुस्तीस चांदीची गदा

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ईश्वरपूर येथील संभुआप्पा यात्रेनिमित्त गुरुवारी (दि. ३ डिसेंबर) दुपारी चार वाजता आष्टा नाका, कामेरी रोड येथील कुसुमनगर येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यामध्ये १०० हून अधिक चुरशीच्या कुस्त्या होणार आहेत. नामवंत मल्लांच्या काटाजोड लढतींचा थरार कुस्तीशौकिनांना पाहायला मिळणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे प्राचार्य संजय ढोबळे-पाटील व महाबली केसरी संग्राम जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली.

गेली २७ वर्षे बंद असलेली कुस्तीची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आली असून, यंदाच्या मैदानात नामवंत मल्ल शड्डू ठोकणार असल्याचे ढोबळे-पाटील यांनी सांगितले. आखाड्याच्या चारही बाजूंनी प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे.

मैदानाचे उद्घाटन मठाधिपती मिलिंद मटकरी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्यासह राज्यातील नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत. निवेदक म्हणून सुरेश जाधव चिंचोलीकर व अभिजित माने काम पाहणार असून, दत्ता आवळे बंधूंच्या हलगीचा कडकडाट आणि अमोल चौधरी यांच्या तुतारीचा निनाद मैदानाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

मैदानी खेळांतून घडावी बलदंड पिढी

"संभुआप्पा उरूसानिमित्त आयोजित या कुस्ती मैदानातून ईश्वरपूर परिसरातील कुस्तीची परंपरा पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न आहे. नवीन पिढी बलदंड आणि सशक्त होण्यासाठी मन, मेंदू आणि मनगट मजबूत होणे आवश्यक असून, त्यासाठी मैदानी खेळांचे आयोजन वारंवार झाले पाहिजे. उरूण-ईश्वरपूर शहरात २५ वर्षांपूर्वी संभुआप्पा-बुवाफन यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान भरविले जात होते; मात्र कालांतराने ही परंपरा खंडित झाली. आता नव्या होतकरू तरुणांच्या पुढाकारातून आणि दानशूर व्यक्ती व देणगीदारांच्या सहकार्याने ही परंपरा पुन्हा सुरू केली जात आहे. हे मैदान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य संजय ढोबळे-पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT