सांगली : लॉकडाऊनमध्ये काम करताना धोंडीबा सरगर या कामगाराची कारखान्यात हाताची 4 बोटे गेली. मदत करण्यास कारखान्याच्या कंपनीने हात झटकले. त्यामुळे येथील सारडा नामक कंपनी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देऊन न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने कंपनीस चार लाख 36 हजार रुपये भरपाई रक्कम व 2020 पासून त्यावरील व्याज देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कामगार नेते हरिदास लेंगरे यांनी दिली.
ते म्हणाले, ही घटना सन 2020 मध्ये कुपवाड एमआयडीसीमध्ये गोपीकिसन सारडा मिलमध्ये घडली. हमालीचे काम करणारे धोंडीबा सरगर मशीनवरती काम करताना हाताची चार बोटे कट झाली. कंपनी व्यवस्थापकाने दवाखान्यात नेले नाही. तू कॉन्ट्रॅक्टरतर्फे आला आहेस, असे सांगून हात झटकले. त्यानंतर कुपवाड पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार करून कंपनीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा खटला न्यायालयात चालला आणि न्यायालयाने 4 लाख 36 हजार तसेच 2020 पासून त्या रकमेवर व्याज देण्याचे आदेश दिले.