ताकारीच्या कालव्यात बुडून कामगाराचा मृत्यू File Photo
सांगली

Sangli News : ताकारीच्या कालव्यात बुडून कामगाराचा मृत्यू

मोहिते वडगाव येथील घटना, पंप बंद करून शोध

पुढारी वृत्तसेवा

देवराष्ट्रे : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्यात कपडे धुण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याने सोनू कुमार (वय २७, मूळ रा. बिहार) या परप्रांतीय बांधकाम कामगाराचा बुडून मृत्यू झाला. मोहिते-वडगाव (ता. कडेगाव) हद्दीत बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू कुमार हा बिहार येथील रहिवासी असून तो गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त मोहिते-वडगाव परिसरात वास्तव्यास होता. बुधवारी दुपारी ताकारी योजनेच्या मुख्य कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेला असता अचानक त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याचा वेगात वाहून गेला.

स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा व मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने मृतदेह सापडत नव्हता. अखेर पाटबंधारे प्रशासनाला माहिती देऊन ताकारी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनवरील उपसा पंप तातडीने बंद करण्यात आले.

पंप बंद केल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी झाला आणि सुमारे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर ताकारी योजनेचे बंद केलेले पंप पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. या घटनेची फिर्याद सुधीर सुतार यांनी दिली असून चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT