सांगली : राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत सोमवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा व पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेला आता वेग येणार आहे.
इस्लामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. विटा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. तासगाव व पलूस नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून जत व आष्टा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुले झाले आहे. प्रथमच होत असलेल्या आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. याशिवाय खानापूर नगरपंचायतीतही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जाहीर झाले आहे. कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून कवठेमहांकाळ व शिराळा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुले झाले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच निवडणूक
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. फुटीनंतर गेल्या वर्षा-दोन वर्षात शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, अशा चार गटांत विभागणीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर युती, आघाडीची समीकरणे जुळवून नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार देताना नेतेमंडळींनाही कसरत करावी लागणार आहे.