Atpadi Murder Case Pudhari
सांगली

Atpadi Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून निंबवडे येथे पत्नीचा खून

निंबवडे (ता. आटपाडी) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने अमानुषपणे मारहाण पत्नीचा खून केला

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : निंबवडे (ता. आटपाडी) येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने लाकडी दांडक्याने अमानुषपणे मारहाण पत्नीचा खून केला. गुरुवारी (दि. 19) रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंगल अंकुश वाघमारे (32) असे मृत विवाहितेचे नाव असून संशयित पती अंकुश बाळू वाघमारे (37, रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जि. रायगड) याला आटपाडी पोलिसांनी तत्काळ अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी, मूळचे रायगड जिल्ह्यातील असलेले हे कुटुंब निंबवडे गावाबाहेर ओढ्यालगतच्या शेतात तात्पुरत्या खोपटात वास्तव्यास होते. हे कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करते. संशयित अंकुश बाळू वाघमारे हा पत्नी मंगल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडणे करत असे. गुरुवारी सकाळी याच कारणावरून पती-पत्नीत वाद झाला. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा विकोपाला गेला. मंगल हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भाऊ पप्पू अंतू जाधव व इतर नातेवाईक धावत आले.

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पाहिले असता, अंकुश हा पत्नीला लाकडाने बेदम मारहाण करत होता. नातेवाईकांना पाहताच त्याने तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मंगल यांना तातडीने निंबवडे गावात नेण्यात आले. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी आपत्कालिन रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

या प्रकरणी पप्पू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलिसांनी पती अंकुश वाघमारे याला अटक केली. शुक्रवारी त्याला विटा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिस निरीक्षक विनय बहिर अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT