तासगाव : पाडळी (ता. तासगाव) येथून शनिवारी दुपारी अपहरण झालेला अडीच वर्षांचा शंभूराज पाटील हा मंगळवारी सकाळी गावाशेजारी मळ्यात असणार्या मंदिरात सुखरूप मिळाला. अपहरणकर्त्यानेच शंभूराजला येथे सोडले असावे, अशी चर्चा आहे.
शनिवार, दि. 5 रोजी शंभूराजचे अपहरण झाले होते. त्याच्या शोधासाठी पोलिस, आयुष हेल्पलाईन पथक, वनविभागाचे पथक, तसेच ग्रामस्थांनी मोहीम राबविली होती. परिसरातील संभाव्य सहा विहिरी, ओढापात्र, अन्य संशयित ठिकाणी शोध घेण्यात आला. पोेलिस अधीक्षक संदीप घुगे यांनीही घटनेची गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली होती. त्यांनी पोलिस पथकांना सूचना दिल्या होत्या.
तीन दिवस शोधमोहीम राबवूनही पोलिसांना अपहृत शंभूराज याचा ठावठिकाणा लागला नाही. मात्र मंगळवारी सकाळी पाडळी येथून भवानीनगरकडे जाण्यार्या रस्त्यावर असणार्या शेतातील छोट्या मंदिरात शंभूराज असल्याचे दिसून आले. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ व पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीत हा बालक सुरक्षित असल्याचे आढळून आले. यानंतर त्याला कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले.