कापरी : येथे टॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करताना शेतकरी  (छाया : विठ्ठल नलवडे)
सांगली

Sangli News| परतीच्या पावसाने रब्बी पेरणीला गती

शिराळा तालुक्यात मशागतीची कामे गतीने

पुढारी वृत्तसेवा

विठ्ठल नलवडे

शिराळा : शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रब्बी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना तसेच प्रत्यक्ष पेरणीला वेग आला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत तयार करुन पेरण्या करू लागले आहेत

शिराळा तालुक्यात जवळपास चार महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. चातकाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होता. तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने आणि दीर्घकाळ पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम झाला. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे.

बहुतांश शेतकरी ऊस गाळपासाठी पाठविल्यानंतर रब्बी पिकांची पेरणी करतात. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, शाळू आदी पिकांतून भरून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, खरीप पिकांसाठी केलेला खर्चही उत्पन्नातून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

शिराळा तालुक्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ७ हजार ७८० हेक्टर आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने रब्बीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे झालेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला असला, तरी आगामी काळात पिकांना आवश्यक पाणी मिळणार का, याची चिंता कायम आहे. रब्बी हंगामातील शाळू, मका, गहू, हरभरा, पेकांची पेरणी कडे शेतकरी वळले आहेत. गहू साठी प्रथम ७०, ,लोकवन व शाळू साठी मालदांडी ५ व ९ नंबरला पसंती दाखवतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT