जत : येळवी (ता. जत) येथील एका कुटुंबाला वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून 40 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलिसांनी संशयित रणजित तुकाराम कुंभार (वय 36, रा. भोसे-करकंब, ता. पंढरपूर) याला अटक केली आहे.
जत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व 3(5) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने मंत्रालयात मोठी ओळख असल्याचा बनाव केला होता. येळवी येथील आवटे कुटुंबाला विश्वासात घेऊन त्याने वाईन शॉप परवान्यासाठी डिपॉझिट, कर, कार्यालयीन खर्च आणि कर्ज प्रक्रिया अशी विविध कारणे सांगितली. या बहाण्याने त्याने फोन-पे आणि रोख स्वरूपात तब्बल 40.54 लाख रुपये उकळले होते.
ही कारवाई सहायक निरीक्षक लातुरे यांनी केली. संशयिताच्या अटकेची माहिती त्याचा मित्र नितीन गणपती तावसकर (रा. कुंभारी, ता. जत) यांना नोटीसद्वारे कळवण्यात आली आहे.