Murder Case  Pudhari
सांगली

Sangli Crime : पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाचा खून

रेवणगाव पठारावर घटना; सहकारी गंभीर जखमी; अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

विटा : रेवणगाव (ता. खानापूर) पठारावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी पवनचक्कीच्या दोन सुरक्षारक्षकांच्या डोक्यात वार केले. त्यात आनंदा भाऊ गुजले (वय ४८) यांचा मृत्यू झाला, तर प्रकाश दौलू गुजले (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही रेवणगाव (ता. खानापूर) येथील रहिवासी आहेत. मंगळवार, दि. २४ रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक विजय अनिल माने (वय २८, रा. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

रेवणगाव हद्दीतील गट क्र. ४४१ मधील वेस्टास पवनचक्कीच्या आर-९ येथील पोस्टवर मंगळवारी रात्री आनंदा गुजले व प्रकाश गुजले कर्तव्यावर होते. यादरम्यान अज्ञातांनी हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केले. मंगळवारी रात्री त्यांच्या पर्यवेक्षकाने पोस्टवर पाहणी करून दोघांची उपस्थिती नोंदविली होती; मात्र पहाटे दुसऱ्या फेरीत दोघे पाय बांधलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळले. हल्ल्याचे कारण व वापरलेले हत्यार अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांना विटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच आनंदा गुजले यांचा मृत्यू झाला. प्रकाश गुजले यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिनाभरापूर्वी याच परिसरात तारा चोरीची घटना घडली होती. चोरीच्या उद्देशाने आलेल्या टोळीने हा हल्ला केला की त्यामागे अन्य कारण आहे, याचा तपास सुरू असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT