सांगली : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून देत जिवंत जाळून मारण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला. या घटनेत ती ५० टक्के भाजली आहे. सांगली शहरातील कोल्हापूर रोड परिसरात मंगळवार, दि. ८ रोजी ही घटना घडली. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित पतीला पोलिसांनी तत्काळ अटक केली.
फिर्यादी तेजस मेषराज पवार (वय ३२, रा. चिंतामणीनगर, सांगली) यांची बहीण उर्मिला (२८) हिचा विवाह देवीलाल हिरालाल राठोड (२८, रा. हिरा हॉटेलसमोर, कोल्हापूर रोड, सांगली) याच्याशी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पती देवीलाल हा पत्नी उर्मिला हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार त्रास देत होता.
यातूनच ८ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवीलाल याने राहत्या घरी उर्मिला हिच्याशी संशयावरून पुन्हा वाद घातला. तिला जबर मारहाण केली. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. देवीलाल याने ‘तुला आज जिवंत सोडत नाही’ असे म्हणत तिच्यावर रॉकेलसारखा वास येणारा द्रवपदार्थ टाकला आणि काडीपेटी पेटवून तिच्यावर टाकली. या भयानक प्रकारात ती भाजून गंभीर जखमी झाली.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पीडितेचा भाऊ तेजस यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करत संशयित पती देवीलाल राठोड याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, धमकी देणे, आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्री त्याला अटक केली. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक व्हॅनने घटनास्थळी तपासणी करून पुरावे गोळा केले. पोलिसांनी पंचनामा केला असून या प्रकरणी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सांगली शहर पोलिस तपास करत आहेत.