डोक्यात कुर्‍हाड घालून पत्नीने पतीला संपवले  
सांगली

Sangli Crime : डोक्यात कुर्‍हाड घालून पत्नीने पतीला संपवले

वटपौर्णिमेच्या रात्रीची घटना; पत्नीस अटक

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : कौटुंबिक कारणावरून वटपौर्णिमेच्या रात्री पत्नीने झोपलेल्या पतीचा डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून खून केला. ही घटना मंगळवार, दि. 10 जून रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल तानाजी लोखंडे (वय 53, रा. प्रकाशनगर गल्ली क्र. सहा, अहिल्यानगर, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी पत्नी राधिका अनिल लोखंडे (27) हिला अटक केली आहे.

अनिल लोखंडे हे गवंडी काम करीत होते. त्यांची पहिली पत्नी वैशाली यांचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. त्यांना काजल व शिवानी या दोन मुली आहेत. दोघींचेही विवाह झाले असून त्या सासरी असतात. पत्नी वैशाली यांच्या निधनानंतर अनिल एकटेच राहत होते. काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी त्यांचे दुसरे लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार नातेवाईकांनी वडी (ता. खटाव जि. सातारा) येथील बाळकृष्ण इंगळे यांची मुलगी राधिका हिच्याशी 23 मे 2025 रोजी माधवनगर (ता. मिरज) येथील एका मंदिरात अनिल यांचा विवाह झाला.

लग्न होऊन अठरा दिवस झाले. 10 जूनरोजी वटपौर्णिमेसाठी अनिल यांनी राधिकास तिचा मावस भाऊ गणेश नारायण दुबळे (रा. वसंतदादा साखर कारखान्याजवळ, सांगली) यांच्या घरी सोडले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अनिल हे पत्नी राधिकाला घेऊन जाण्यासाठी आले. दोघेही रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर येथे घरी गेले. त्याच रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास गणेश यांनी फिर्यादी मुकेश लोखंडे यांना फोन करून सांगितले की, ‘राधिकाचा फोन आला होता. मावशी गेल्यापासून मला भीती वाटत होती. मी कौटुंबीक कारणातून पती अनिल यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालून खून केला आहे’ ही माहिती मिळताच माधवनगर येथील नातेवाईकांनी अहिल्यानगर येथे अनिल यांच्या घरी धाव घेतली.

अनिल अंथरूणावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजारी रक्ताने माखलेली कुर्‍हाड दिसली. फिर्यादी मुकेश यांनी कुपवाड पोलिसांना माहिती दिली. मिरजेचे पोलिस उपाधिक्षक प्रणिल गिल्डा, सहाय्यक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित राधिकाला ताब्यात घेऊन पंचनामा केला. संशयित राधिकाने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT