Kharif Crops 
सांगली

Sangli News : आषाढाच्या सरींमुळे मिळाला थोडासा दिलासा

रोहिणी, मृग नक्षत्राची हुलकावणी; सोयाबीन, मका, भात, ऊस, भुईमुगाला चांगले वातावरण

पुढारी वृत्तसेवा

सांगली : रोहिणी आणि मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्यानंतर अखेर सांगली जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यातील सोयाबीन, मका, भात, ऊस आणि भुईमूग या खरीप पिकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे.

शिराळा तालुक्यात खरीप पिकांना जीवदान...

शिराळा तालुक्यात अनेक भागात पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने भात, सोयाबीन, भुईमूग, मका, तूर, उडीद, मूग आणि नाचणी ही पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र, रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेततळी, ओढे-नाले आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मिटणार असल्याने पशुपालक सुखावले आहेत. तालुक्यातील चरण आणि पश्चिम भागातही रविवारी रात्री १० ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

सोनहिरा खोऱ्याला दिलासा

कडेगाव तालुक्यातील उसाचे क्षेत्र असलेल्या सोनहिरा खोऱ्यालाही या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. चिंचणी, वाजेगाव, पाडळी, आसद, मोहिते वडगाव, देवराष्ट्रे आणि सोनकिरे या भागात जोरदार पाऊस झाल्याने पेरणीसाठी शेत तयार करण्यास मदत होणार आहे. येथील बहुतांश शेतकरी पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने या पावसामुळे खोऱ्यात पेरणीची लगबग सुरू होण्याची शक्यता आहे.

वाळवा तालुक्यात हलका पाऊस

वाळवा तालुक्यात आणि ईश्वरपूर शहरात मात्र सोमवारी दुपारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या हलक्या पावसामुळे पिकांना काहीअंशी दिलासा मिळाला असला, तरी शेतात पुरेशी ओल नसल्याने खरिपाची टोकणी आणि पेरणी अद्याप खोळंबलेली आहे. येथील शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या आणि सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT