सांगली : महापालिका क्षेत्रातील पाणीपट्टीची थकबाकी आणि चालू मागणी मिळून एकूण ७९ कोटी ५६ लाख रुपयांची येणेबाकी आहे. मात्र, १ एप्रिल ते २७ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत अवघे ५ कोटी ५ लाख रुपये जमा झाले आहेत. एकूण मागणीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने महापालिकेसमोर वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, पाणीपट्टी भरण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीनंतरच्या १३ दिवसांत ९० लाख ८८ हजार रुपयांची वसुली झाली असून, या सवलतीच्या काळात ७ हजार ४७९ ग्राहकांनी बिलांचा भरणा केला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा केला जातो. या तिन्ही शहरांत मिळून एकूण ९९,६२६ नळजोडण्या आहेत. महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी ४५ कोटी ११ लाख ४३ हजार ८७४ रुपये, चालू मागणी ६ कोटी ६४ लाख ३१ हजार ८०२ रुपये, थकबाकीवरील विलंब शुल्क २७ कोटी १० लाख २२ हजार १६ रुपये आणि चालू पाणीपट्टीवरील विलंब शुल्क ७० लाख ४२ हजार २२८ रुपये असे मिळून एकूण ७९ कोटी ५६ लाख रुपये वसूल होणे बाकी आहे.
गेल्या सात महिन्यांत थकबाकीपोटी ३ कोटी ६४ लाख २८ हजार ३२८ रुपये जमा झाले आहेत. चालू मागणीपोटी १ कोटी ३ लाख ९१ हजार ७६७ रुपये, तर विलंब शुल्कापोटी ३६ लाख ८१ हजार ८०८ रुपये वसूल झाले आहेत. अशा प्रकारे एकूण ५ कोटी ५ लाख १ हजार ९०४ रुपयांची वसुली झाली आहे. मात्र, एकूण मागणीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण कमी आहे. थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.