सांगली : पाणी टंचाईमुळे दिवसे दिवस जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढू लागली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या ६६ खासगी व ८ शासकीय अशा ७४ टँकरव्दारे ६६ गावे व ४७९ वाड्यांतील १ लाख ४३ हजार ८८८ बाधित लोकसंख्येला व ९७ हजार ४३४ पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ३० खासगी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जत तालुक्यातील टंचाईग्रस्त ५७ गावे व ४१४ वाड्यांमधील सुमारे १ लाख २४ हजार, ८६७ लोकसंख्येला आणि ८१ हजार २२२ पशुधनाला ६४ टँकरद्वारे (५७ खासगी व ७ शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात १८ खासगी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून ४ डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त १ गाव व ८ वाड्यांमधील १८३४ लोकसंख्येसाठी १ शासकीय टँकर सुरू आहे. नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी २ खासगी विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त १ गाव व ६ वाड्यांमधील ८५५ लोकसंख्येला १ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात ३ खासगी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त ७ गावे व ५१ वाड्यांमधील १६,३३२ नागरिकांना आणि १६,२१२ पशुधनाला ८ खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात ४ विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यात २ गावे टंचाईग्रस्त असून ३ खासगी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.