सांगली : कृष्णा नदीतील मर्यादित पाणीसाठा आणि संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाटबंधारे विभागाने कृष्णा नदीवरील टेंभू बॅरेजच्या खालील बाजूस ते सांगलीच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या डाव्या व उजव्या तिरावर शेती आणि औद्योगिक कारणांसाठी होणाऱ्या पाणी उपशावर दोन दिवस कडक निर्बंध लादले आहेत. दरम्यान, कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पायथा विद्युतगृहाचे सुरू असलेले युनिट सकाळी सात वाजता बंद करण्यात आले आहे. कोयना नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग पूर्ण थांबवण्यात आला आहे.
सांगली शहराच्या हद्दीपर्यंत पिण्याचे पाणी विनाअडथळा आणि वेळेत पोहोचावे, यासाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत. या तात्पुरत्या बंदीतून पिण्याच्या पाणीपुरवठा योजना वगळण्यात आल्या असून, नागरिकांचा पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.
या कालावधीत कोणीही अनधिकृतरीत्या शेती अथवा औद्योगिक कारणांसाठी पाणी उपसा करताना आढळल्यास उपसायंत्रे जप्त करण्यात येतील, तसेच उपसा परवाना एका वर्षासाठी रद्द करण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. बंदी काळात कोणत्याही संभाव्य नुकसानीस विभाग जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नदीपात्रात सांडपाणी किंवा औद्योगिक दूषित पाणी सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये, कारण हे पाणी वाहून नेण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध नाही; त्यामुळे नागरिकांनी व औद्योगिक घटकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.